
खानापूर : मराठा मंडळ संचालित ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालय खानापूर येथे दिनांक 4 जुलै 2025 रोजी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी पालक चिंतन सभा संपन्न झाली. बदलत्या काळानुसार इयत्ता बारावी वार्षिक परीक्षेचे बदललेले स्वरूप समजावून घेण्यासाठी शिवाय बोर्ड परीक्षेत उज्ज्वल निकालाची परंपरा कायम ठेवण्यासाठी सदर चिंतन सभेचे आयोजन करण्यात आले होते. एकंदरीत विद्यार्थीनीनी सुरूवातीपासून जागरूक राहून निरंतर मुल्यमापन प्रक्रियेत आपली उत्तम कामगिरी नोंदवावी याशिवाय पालकांनी आपला सकारात्मक सहभाग दर्शवून आपल्या पाल्यांच्या यशात महत्त्वाचे वाटेकरू व्हावे, पालक म्हणून आपली जबाबदारी काय असायला हवी? याची जाणीव करून देणारी ही चिंतन सभा नक्कीच आशादायी ठरल्याचे चित्र स्पष्ट होताना दिसत होते.
ताराराणी कॉलेज हे खानापूर तालुक्यातील एक महत्वाचे मुलींचे पदवीपूर्व महाविद्यालय असून इथे नेहमीच विद्यार्थ्यांनींच्या सर्वांगीण विकासावर भर दिली जाते.
या चिंतन बैठकीच्या अध्यक्षस्थानी कॉलेजचे प्राचार्य अरविंद पाटील उपस्थित होते. व्यासपीठावर मराठा मंडळ शिक्षण संस्थेचे संचालक श्री. शिवाजीराव एस पाटील, कॉलेजचे ज्येष्ठ प्राध्यापक एन ए पाटील, पालक प्रतिनिधी म्हणून श्री. महादेव कदम, श्री पी एस गुरव, श्री. सचिन देसाई व महिला पालक प्रतिनिधी म्हणून सौ. नीता पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत व प्रस्ताविक प्रा. श्रीमती मंगल देसाई यांनी केले.
“मोबाईल शाप की वरदान!” ह्या विषयावर प्रा. सौ. सुनिता कणबरकर यांनी आपले अभ्यासपूर्ण विचार मांडून उपस्थित पालकांच्या शंका निरसन केल्या व प्रमाणापेक्षा जास्त मोबाईलचा वापर न करण्याचे जाहीर निवेदन केले.
“बारावी वार्षिक परीक्षेचं बदलणारं रूप आणि चाचण्यांचं स्वरूप!” याविषयी प्रा. श्री पी व्ही कर्लेकर यांनी सह उदाहरण आंतरिक चाचणी परीक्षेंचे गुण, नेमून दिलेल्या त्या त्या विषयाच्या कार्याचे लेखन व मौखिक चाचण्या या विषयी सविस्तर माहिती मांडली व पालकांच्या शंकांचे निरसन केले.
मार्च 2026 मध्ये होऊ घातलेली बारावीची वार्षिक परीक्षा किती महत्वाची आहे. विद्यार्थिनी व पालक सतर्क राहून अभिमानास्पद यश मिळविणे ही काळाची गरज आहे हे पटवून देतांना या कामी पालकांचे सहकार्य अत्यंत महत्वाचे असल्याचा निर्वाळा प्राचार्य श्री. अरविंद पाटील यांनी दिला व उपस्थित पालक वर्गाला त्यांच्या पाल्यांना खुणावत असलेल्या अनेक संधींचे विवेचन करीत वेळे सोबत आपण गतीमान होणं गरजेचं असून त्यांना नियमित अभ्यासाचा सराव करण्यास पोषक वातावरण निर्माण करण्याचे जाहीर आवाहन केले.
पालक प्रतिनिधी श्री. महादेव कदम यांनी ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालयांने घेतलेल्या चिंतन सभेचे कौतुक करीत उपस्थित पालक वर्गाने अभ्यासाकडे जातीने लक्ष घालून काॅलेजच्या निकाल सुधारणेत आपला वाटा नोंदवावा व आपण ही याला कटिबद्ध असल्याचे जाहीर केले.
पालक चिंतन सभेचे सूत्रसंचालन खास शैलीत प्रा. श्री टी आर जाधव यांनी केले व शेवटी आभार प्रा. सौ. वनिता गावडे यांनी मानले.

Belgaum Varta Belgaum Varta