
बेळगाव : साक्षीदारातील विसंगतीमुळे मारहाण करून हातोड्याने वार केल्याच्या आरोपातून चौथे जेएमएफसी न्यायालयाने कंग्राळी खुर्द येथील एकाची निर्दोष मुक्तता केली आहे.
न्यायालयाने निर्दोष मुक्तता केलेल्याचे नाव सिद्धार्थ चंद्रकांत चौगुले (वय 25, रा. महादेव रोड, कंग्राळी खुर्द ता. जि. बेळगाव) असे आहे. प्रकरणाची माहिती अशी की, संशयित सिद्धार्थ चौगुले याने चौथा क्रॉस रामनगर, कंग्राळी खुर्द (ता. बेळगाव) येथील जय विनायक किल्लेकर यांच्याकडून ईएमआय आधारद्वारे एक नवा मोबाईल संच खरेदी केला होता.
मात्र हप्त्याची रक्कम भरली नव्हती. याच कारणावरून गेल्या 20 मार्च 2021 रोजी रात्री 10:30 च्या दरम्यान संशयिताने जय किल्लेकर याला एपीएमसी मार्केट यार्ड जवळील गेट जवळ बोलावून घेतले. त्यावेळी दोघांमध्ये वादावादी होऊन त्याचे पर्यवसान हाणामारीत झाले. यावेळी संशयीत सिद्धार्थ याने जय याला मारहाण केल्यामुळे त्याने घरी जाऊन विनायक जोतिबा किल्लेकर व शुभम अनिल मोहनगेकर यांना घटनास्थळी बोलावून आणले. त्यावेळी संशयित सिद्धार्थ याने त्या दोघांनाही हातोड्याने मारहाण करून अर्वाच्य शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी जय किल्लेकर याने एपीएमसी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यामुळे पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेऊन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
बेळगाव चौथे जेएमएफसी न्यायालयामध्ये या खटल्याची सुनावणी होऊन साक्षीदारातील विसंगतीमुळे संशयित सिद्धार्थ चंद्रकांत चौगुले यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. बचाव पक्षातर्फे ॲड. मारुती कामाण्णाचे यांनी काम पाहिले.

Belgaum Varta Belgaum Varta