Wednesday , December 10 2025
Breaking News

कोनेवाडीत भगवा फडकवल्याप्रकरणी उर्वरित चौघांनाही जामीन

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव महापालिकेसमोर कन्नड संघटनांनी लाल -पिवळा कन्नड ध्वज फडकवल्याच्या निषेधार्थ कोनेवाडी (ता. जि. बेळगाव) येथे भगवा ध्वज फडकावून ‘जय महाराष्ट्र’ अशी घोषणा देऊन मराठी व कन्नड भाषिकांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणाच्या खटल्यातील वॉरंट जारी केलेल्या 5 जणांपैकी शिवसेना नेते विजय शामराव देवणे यांना यापूर्वीच जामीन मंजूर झाला आहे. आता उर्वरित चौघेजण आज शुक्रवारी बेळगाव चौथे जेएमएफसी न्यायालयासमोर हजर झाल्यामुळे न्यायालयाने त्यांना देखील जामीन मंजूर केला आहे.

न्यायालयाने आज जामीन मंजूर केलेल्यांमध्ये शिवसेनेचे संग्रामसिंग भाग्यश्वरराव कुपेकर -देसाई, सुनील अर्जुन शिंत्रे, अमृत रामा जत्ती आणि संतोष लक्ष्मण माळवेकर यांचा समावेश आहे. चार वर्षांपूर्वी बेळगाव महानगरपालिकेसमोर कन्नड संघटनांकडून बेकायदेशीररित्या लाल -पिवळा ध्वज फडकवण्यात आला. बेळगाव महापालिकेसमोर लाल -पिवळा ध्वज फडकवण्याच्या कृतीचा निषेध करण्यासाठी कोल्हापुर येथील शिवसेनेचे नेते विजय देवणे हे 21 जानेवारी 2021 रोजी आपल्या सहकाऱ्यांसह बेळगाव तालुक्यातील कोनेवाडी गावात चोरट्या मार्गाने दाखल झाले. तेथे त्यांनी कन्नड ध्वजाच्या विरोधात भगवा ध्वज फडकावून जय महाराष्ट्रच्या घोषणा दिल्या. तसेच आपल्या या कृतीचे फोटो आणि व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर व्हायरल केले. त्यांची ही कृती म्हणजे कन्नड आणि मराठी भाषिकांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचा ठपका ठेवत पोलिसांनी देवणे आणि उपरोक्त चौघांवर गुन्हा दाखल करून न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले.

सदर खटल्याची सुनावणी बेळगाव चौथे जेएमएफसी न्यायालयात सुरू असून सुनावणीला सातत्याने गैरहजर राहत असल्याबद्दल न्यायालयाने विजय शामराव देवणे यांच्यासह पाच जणांविरुद्ध वॉरंट जारी केले होते. यापैकी देवणे यांना गेल्या सोमवारी 7 जुलै रोजी जामीन मिळाला आहे. त्यानंतर आज शुक्रवारी उर्वरित चौघेजण न्यायालयासमोर हजर झाल्यामुळे न्यायालयाने या चौघांनाही जामीन मंजूर केला आहे. आरोपींच्यावतीने ॲड. शामसुंदर पत्तार आणि ॲड. हेमराज बेंचन्नावर काम पाहत आहेत.

About Belgaum Varta

Check Also

उच्च न्यायालयाचा बेळगाव पोलीस प्रशासनाला दणका

Spread the love  बेळगाव : बेळगाव पोलीस प्रशासनाला चांगला दणका देताना खोटे-नाटे गुन्हे नोंदवून गुन्हेगारांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *