
बेळगाव : बेळगाव शहरासह उपनगरात गांजा व इतर अंमली पदार्थ विक्री विरोधात पोलिसांनी धडक मोहीम राबवून बेळगाव शहर अंमली पदार्थ मुक्त करण्याचा स्तुत्य उपक्रम राबविल्याबद्दल माजी नगरसेविका व महिला आघाडीतर्फे आज सोमवारी सकाळी बेळगाव पोलीस आयुक्त कार्यालयात जाऊन बेळगाव शहर पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

महिला आघाडीचे अध्यक्ष माजी उपमहापौर रेणू किल्लेकर व माजी महापौर सरिता पाटील यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन पोलीस आयुक्त बोरसे यांचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी बोलताना महिला आघाडीच्या अध्यक्षा रेणू किल्लेकर म्हणाल्या की, आपण बेळगाव शहरात गांजासह इतर अंमली पदार्थांविरोधात धडक मोहीम राबवीत आहात. आपला हा उपक्रम खरोखर कौतुक करण्यासारखाच आहे. आज बेळगाव शहरात अनेक तरुण-तरुणी अंमली पदार्थांच्या आहारी गेलेले आहेत. थोड्याशा पैशांसाठी बरेच तरुण अंमली पदार्थ विक्री करत असताना दिसतात. त्यांच्यावर आपण कारवाई केली आहे मात्र अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या त्यांच्या मुख्य सूत्रधारालाच अटक करावी जेणेकरून बेळगाव शहर पूर्णपणे अंमली पदार्थ मुक्त होईल.

माजी महापौर सरिता पाटील म्हणाल्या की, बेळगाव शहरात सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात. गणेशोत्सव काळात देखावे पाहण्यासाठी नागरिकांसह आबालवृद्धांची मोठी गर्दी होते. बहुतांश गणेशोत्सव मंडळांचे मंडप हे बाहेरून बंद स्वरूपाचे असतात व आतमध्ये देखावे केले जातात ते पाहण्यासाठी नागरिकांना लांबचलांब रांगेत उभे राहावे लागते बऱ्याचदा याप्रसंगी वादाचे प्रसंग उद्भवतात. गर्दीमुळे लहान मुलांना महिला वर्गाला व ज्येष्ठ नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते. गर्दीचा फायदा घेऊन पाकीटमारी सारखे प्रकार देखील होतात. या प्रकारांना आळा घालण्यासाठी गणेशोत्सव मंडळाने देखावे सादर करतेवेळी आपले मंडप खुले ठेवावे जेणेकरून मंडपांसमोर गर्दी होणार नाही व नागरिक लांबून देखील देखावा पाहू शकतील. पोलिस प्रशासनाने गणेशोत्सव मंडळांना या संदर्भात सक्त सूचना कराव्यात. त्याचबरोबर मच्छे येथील विवाहितेच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी योग्यरीतीने तपास करून गुन्हेगारास कडक शासन करण्यात यावे अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली.
यावेळी माजी महापौर वंदना बेळगुंदकर, माजी उपमहापौर रेणू मुतगेकर, माजी नगरसेविका सुधा भातकांडे, माजी नगरसेविका रूपा नेसरकर, माजी नगरसेविका माया कडोलकर, शिवानी पाटील, प्रिया कुडची यांच्यासह महिला आघाडीच्या कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

Belgaum Varta Belgaum Varta