
जायंट्स आय फौंडेशनच्या माध्यमातून मरणोत्तर देहदानाचा केला होता संकल्प
बेळगाव : गुरुवार पेठ, टिळकवाडी येथील रहिवासी कॉ. सौ. कला नागेश सातेरी (वय ७२) यांचे अल्पशा आजाराने मंगळवार दि. २२ रोजी निधन झाले.
त्यांच्या पश्चात पती माजी महापौर ऍड. नागेश सातेरी, मुलगा ऍड. अजय सातेरी, मुलगी प्रा. शीला मेणसे, सून सुनिता सातेरी, जावई, दोन नाती असा परिवार आहे.
कॉ. कला सातेरी या भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या ज्येष्ठ सदस्या, भारतीय महिला फेडरेशनच्या बेळगाव जिल्हा शाखेच्या अध्यक्षा तसेच राज्य शाखेच्या खजिनदार व राष्ट्रीय मंडळाच्या सदस्या होत्या. याबरोबरच अन्नपूर्णा महिला मंडळ बेळगाव शाखेच्या पदाधिकारी होत्या. प्रगतिशील लेखक संघ, बेळगांव सिटी मजदूर को-ऑप. सोसायटी तसेच बेळगावमधील विविध संघ संस्थांशी त्यांचे जवळचे संबंध होते.
त्यांच्या इच्छेनुसार जायंट्स आय फौंडेशनच्या माध्यमातून जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालयाच्या शरीरशास्त्र विभागाला देहदान करण्यात आले. तसेच बिम्सच्या नेत्र विभागाला नेत्रदान व केएलई रोटरीच्या त्वचा बँकेला त्वचा दान करण्यात आले. यानंतर प्रा. आनंद मेणसे आणि ज्येष्ठ नेते किरण ठाकुर यांची श्रध्दांजलीपर भाषणे झाली. त्यांनी कला सातेरी यांच्या सामाजिक कार्याची प्रशंसा करून मृत्युपश्चात देहदान करून त्यांनी आपली सामाजिक बांधिलकी जपल्याचे सांगितले.
यावेळी समाजातील विविध संस्थाचे मान्यवर, वकील मंडळी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


Belgaum Varta Belgaum Varta