
बेळगाव : सीमाभागात भाषिक हक्कासाठी मराठी भाषा, मराठी संस्कृती जपण्यासाठी लढा देणाऱ्या मराठी भाषिकांवर करडी नजर ठेवून राहणारे कर्नाटक रक्षक वेदिकेचे तथाकथित कार्यकर्त्यांमुळे बेळगाव शहरातील कायदा व सुव्यवस्था नेहमीच बिघडत आली आहे. आज देखील याची प्रचिती बेळगावकराना आली आहे.
गुरुवारी महानगरपालिकेच्या सर्वसाधारण बैठकीचे इतिवृत्त मराठी भाषेत मागणाऱ्या नगरसेवकाविरोधात कन्नड रक्षण वेदिका नारायण गौडा गटाच्या कार्यकर्त्यांनी थयथयाट करत मराठी भाषिक समिती नेते व मराठी संघटनांच्या विरोधात गरळ ओखण्याचे काम केले आहे. भाषिक अल्पसंख्यांक कायद्यानुसार घटनात्मक अधिकाऱ्याने मातृभाषेतून परिपत्रके देण्याची मागणी करणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नगरसेवकांना हद्दपार करण्याची हास्यास्पद मागणी कर्नाटक रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी आज केली आहे.
![]()
बेळगाव महानगरपालिकेतील सभेचा वृत्तांत मराठीतून देण्यात यावा अशी मागणी विद्यमान नगरसेवक रवी साळुंखे, नगरसेवक शिवाजी मंडोळकर, नगरसेविका वैशाली भातकाडे यांनी मागील तीन वर्षांपासून केली होती मात्र प्रत्येक वेळी मराठी नगरसेवकांची ही मागणी डावलत आल्याचे दिसून आले. आज गुरुवारी पार पडलेल्या सभेत मराठी भाषेत सभेचा वृत्तांत देण्याची मागणी केली असता सत्ताधारी तसेच विरोधी गटातील देखील नगरसेवकांनी गदारोळ घातल्याचे पाहून मराठी नगरसेवकांनी सभात्याग केला. या घटनेनंतर कर्नाटक रक्षण वेदिकेच्या तसेच काही कन्नड संघटनांच्या मूठभर कार्यकर्त्यांनी पोलीस संरक्षणात महानगरपालिकेसमोर निदर्शने केली व नगरसेवक रवी साळुंखे यांना तात्काळ हद्दपार करावे अशी मागणी करत महानगरपालिकेसमोर धरणे आंदोलन केले. कर्नाटक राज्यात 60% कन्नड भाषेची सक्ती करण्यात येत असताना सीमाभागातून महाराष्ट्र एकीकरण समिती, शिवसेना नेते त्याचबरोबर नगरसेवक रवी साळुंखे यांना हद्दपार करण्याची हास्यास्पद मागणी करवेच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.

Belgaum Varta Belgaum Varta