बेळगाव : श्री सौंदत्ती रेणुका यल्लम्मा मंदिराच्या विकासासाठी २१५ कोटी रुपयांच्या योजनेला राज्य मंत्रिमंडळाने प्रशासकीय मान्यता दिली असून, येत्या १५ सप्टेंबरपर्यंत सर्व कामांना कार्यादेश दिला जाईल, अशी माहिती पर्यटन विभागाचे मंत्री एच.के. पाटील यांनी दिली.
बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात काल शनिवारी (२६ जुलै) आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.
मंदिरामध्ये मूलभूत सुविधा आणि विकासासाठी विविध योजना तयार करण्यात आल्या आहेत. या योजनांसाठी राज्य मंत्रिमंडळाने २१५ कोटी रुपयांच्या योजनांना प्रशासकीय मान्यता दिली आहे. जिल्हाधिकाऱ्यांना या योजनांच्या अंमलबजावणीसाठी अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे, असेही मंत्री पाटील यांनी सांगितले.
सुमारे २१५ कोटी रुपयांच्या निधी अंतर्गत विविध विकासकामे हाती घेतली जातील आणि सरकारच्या अपेक्षेनुसार ही कामे लवकर सुरू करावीत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. यासंबंधी निविदा काढून कार्यादेश देण्याचे काम १५ सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
यल्लम्मागुड्डा येथे वसतिगृह आणि अतिथिगृह बांधण्यासाठी अनेक दानशूर व्यक्ती पुढे येत आहेत. त्यांना आवश्यक जागा उपलब्ध करून दिली जाईल आणि तिथे बांधण्यात येणारी इमारत मंदिराच्या मालकीची असेल. दानशूर व्यक्तींशी करार करून अतिथिगृह बांधणीला परवानगी दिली जाईल आणि मंदिराकडून डिझाइन उपलब्ध करून दिले जाईल. २६ ऑगस्ट २०२५ रोजी दानशूर व्यक्तींची सभा बोलावून योजनेचा तपशील सांगितला जाईल आणि त्यानंतर करार केला जाईल, असेही त्यांनी नमूद केले.
एका प्रश्नाला उत्तर देताना मंत्री पाटील यांनी सांगितले की, २१५ कोटी रुपये खर्चापैकी ९७ कोटी रुपये मंदिर विकास मंडळाकडून दिले जातील, तर एस.ए.एस.सी.आय. कर्ज योजनेअंतर्गत केंद्र सरकार १०० कोटी रुपयांचे कर्ज देईल.
यावेळी आमदार विश्वास वैद्य, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta