बेळगाव : आपल्या विविध मागण्यांसाठी कर्नाटक राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघाच्या बेळगाव जिल्हा शाखेतर्फे आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून मुख्यमंत्र्यांच्या नावे निवेदन सादर करण्यात आले.
कर्नाटक राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघाच्या बेळगाव जिल्हा शाखेचे अध्यक्ष जे एम जैनेखान आणि सचिव मडप्पा भजंत्रि यांच्या नेतृत्वाखाली आज सोमवारी सकाळी डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथून कित्तूर राणी चन्नम्मा सर्कल मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. आपल्या विविध मागण्यांची पूर्तता सरकारने करावी यासाठी काढण्यात आलेल्या या मोर्चात जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतीचे स्त्री -पुरुष कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आपल्या मागण्यांची घोषणा देत निघालेला या मोर्चाची जिल्हाधिकारी कार्यालय आवारामध्ये सांगता झाल्यानंतर त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या नावे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. सदर निवेदनामध्ये ग्रामपंचायतमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे किमान वेतन 31 हजार रुपये केले जावे त्यांना निवृत्तीनंतर किंवा निधनानंतर किमान 6 हजार रुपये मासिक निवृत्ती वेतन दिले जावे. ग्रामपंचायतीचे कर वसुली कर्मचारी, डाटा एन्ट्री ऑपरेटर, स्वच्छता कर्मचारी वगैरे कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा दिला जावा आदी विविध 22 मागण्यांचा समावेश आहे. कर्नाटक राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघाच्या बेळगाव जिल्हा शाखेतर्फे करण्यात आलेल्या आजच्या मोर्चात दिलीप भोवी, एस. आय. सिदनाळ, यल्लनगौडा पाटील, रमेश होळी, यल्लाप्पा नायक, गणपती गुरव, मंजुनाथ कर्की वगैरे संघटनेच्या कार्यकारिणीच्या सदस्यांसह बहुसंख्य ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी दर्शवलेला सहभाग लक्षवेधी होता.

Belgaum Varta Belgaum Varta