बेळगाव : सध्या बेळगाव महानगरपालिकेत चालू असलेली कन्नडसक्ती तात्काळ थांबवण्यात यावी, अशी मागणी मराठी भाषिक माजी नगरसेवकांनी महानगरपालिका आयुक्त शुभा बी. यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. आज शुक्रवार दि. 1 ऑगस्ट रोजी मराठी भाषिक माजी नगरसेवकांनी महानगरपालिका आयुक्तांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी बोलताना ऍड. अमर येळ्ळूरकर म्हणाले की, बेळगाव शहरात चाललेली कन्नडसक्ती ही पूर्णपणे बेकायदेशीर आहे. बेळगाव महानगरपालिकेची स्थापना 1881 मध्ये झाली आहे तेव्हापासून 1980 पर्यंत या स्थानिक स्वराज्य संस्थेचे कामकाज मराठी भाषेत चालत होते. 1980 नंतर आज पर्यंत मराठी व कानडी या दोन्ही भाषांमध्ये महानगरपालिकेचे कामकाज सुरळीत चालू होते 1981 मध्ये कर्नाटक सरकारने स्थानिक भाषेबाबत एक कायदा अमलात आणला होता त्यानुसार जर एखाद्या भागात 15 टक्क्यांपेक्षा जास्त लोक इतर भाषा बोलणारे असतील तर त्यांना त्यांच्या भाषेतही कागदपत्रे देणे बंधनकारक आहे. मात्र बेळगावच्या सध्याच्या महापालिका आयुक्तांनी कन्नडसक्ती तीव्र करत बेकायदेशीरपणे मराठी व इंग्रजी भाषेतील फलक हटवत आहेत. कोणाच्याही दबावाला बळी पडून मराठी भाषेतील फलक काढल्यास बेळगावातील जनता त्याला कायदेशीर उत्तर देईल असे ऍड. अमर येळ्ळूरकर यांनी यावेळी सांगितले.
निवेदन देण्यासाठी माजी महापौर शिवाजी सुंठकर, माजी महापौर सरिता पाटील, माजी उपमहापौर रेणू किल्लेकर, माजी उपमहापौर प्रकाश शिरोळकर, माजी नगरसेवक सुनील बाळेकुंद्री उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta