
बेळगाव : सौंदत्ती शहरात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. खासकरुन रेणुका-यल्लम्मा मंदिराच्या परिसरात पाणी शिरले होते. शुक्रवारी सायंकाळच्या जोरदार पावसामुळे 500 वर्षांपूर्वीच्या मंदिरात पाणी गेले होते.
सौंदत्ती व यल्लम्मा डोंगर परिसरात ढगफुटीसदृश्य पावसाने तडाखा दिला. तासाहून अधिक काळ पाऊस झाल्याने सर्वांची तारांबळ उडाली. सौंदत्तीहून यल्लम्मा डोंगराकडे जाणाऱ्या रस्यावर पाणी आल्याने संपर्क तुटला आहे. पावसामुळे शहरातील सर्वच रस्त्यांचे तळे झाले. पावसाचा सौंदत्ती शहर व भागातील पिकांना मोठा फटका बसला आहे.

विजांचा कडकडाट व ढगांच्या गडगडाटासह झालेल्या मुसळधार पावसामुळे सौंदत्ती शहरातील नाले, गावागावातील ओढ्यांना पूर आला. रस्त्यांनाही ओढ्याचे स्वरुप आल्याने कांहीकाळ जनजीवन ठप्प झाले. पाण्याच्या वेगाने व कांही ठिकाणी पाण्याच्या प्रवाहामुळे पिके वाहून गेली. तर झाडे भुईसपाट झाल्याने परिणामी शेतकऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. अतिवृष्टीने यल्लम्मा मंदिरात बऱ्याच वर्षानंतर पाणी शिरल्याने भाविक व नागरिकांची तारांबळ उडाली.

Belgaum Varta Belgaum Varta