बेळगाव : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मोर्चाला परवानगी मागितली असता पोलिस प्रशासनाने कायदा व सुव्यवस्था तसेच सणासुदीचे कारण देत परवानगी नाकारली तर दुसरीकडे मात्र अवघ्या 24 तासात कर्नाटक रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी बेळगाव शहरातील चन्नम्मा चौकातून निदर्शने करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करत आंदोलन केले. आश्चर्याची बाब म्हणजे पोलिस प्रशासनाने या आंदोलनकर्त्यांना कोणत्याही प्रकारची आढकाठी केली नाही की अटक केली नाही. यावरून जिल्हा प्रशासनाचा मराठी द्वेष्टेपणा व दुटप्पीपणा उघड होतो.
काल 11 ऑगस्ट रोजी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली मराठी भाषिकांचा कन्नड सक्तीविरोधात तसेच भाषिक अल्पसंख्यांक कायद्याचे अधिकार मिळावेत यासाठी निवेदन देण्यात आले. वास्तविक हे निवेदन धर्मवीर संभाजी चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येणार होते. याबाबत समिती शिष्टमंडळाने प्रशासनाकडे रीतसर परवानगी मागितली होती परंतु पोलीस प्रशासनाने वाहतुकीला अडथळा होतो, कायदा व सुव्यवस्था तसेच शांतता बिघडू शकते त्याचप्रमाणे सध्या सणासुदीचे दिवस आहेत अशी विविध कारणे देत सदर मोर्चाला परवानगी नाकारली होती. परंतु आज कन्नड संघटनांना मोर्चा व आंदोलनास मुभा दिली. पोलिस प्रशासनाच्या या दुटप्पी धोरणाबाबत मराठी भाषिकातून संताप व्यक्त होत आहे.

Belgaum Varta Belgaum Varta