बेळगाव : नियमांचे उल्लंघन केलेल्या बेळगाव शहर परिसरातील शहरातील अनेक अनधिकृत ब्युटी पार्लर, स्किन केअर सेंटर आणि रुग्णालयांवर आरोग्य विभागाने आज मोठी छापेमारी केली.
शुक्रवारी (15 ऑगस्ट) बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्या निर्देशानुसार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. ईश्वर गदादी यांनी ही कारवाई केली, ज्यामध्ये 30 अनधिकृत रुग्णालये, क्लिनिक आणि ब्युटी पार्लरची तपासणी करण्यात आली. या धाडीमध्ये अनेक ठिकाणी अनधिकृत आणि अकुशल व्यक्तींद्वारे ही केंद्रे चालवली जात असल्याचे उघड झाले आहे. शहरात 10 अनधिकृत रुग्णालये, क्लिनिक आणि ब्युटी सेंटर्स सील करण्यात आली आहेत, तर 7 पार्लर व रुग्णालयांना नोटीस बजावण्यात आली आहे. छाप्यादरम्यान, असे आढळून आले की काही ब्युटी पार्लर मेकअप, थ्रेडिंग आणि वॅक्सिंग सेवा देण्याऐवजी त्वचेची चमक वाढवण्यासाठी हानिकारक रसायने आणि स्टिरॉइड्स वापरत होते. अधिकाऱ्यांनी आरपीडी, टिळकवाडी, कॅम्प, शाहूनगर, रविवार पेठ, अनगोळ, वडगाव आणि सदाशिवनगर यांसारख्या भागांत धाडी टाकल्या. त्यावेळी कारवाईच्या भीतीने अनेक ब्युटी पार्लर बंद करुन संचालक पसार झाल्याचे दिसून आले.

Belgaum Varta Belgaum Varta