बेळगाव : अंधश्रद्धा निर्मूलन समिती बेळगाव व प्रगतशील लेखक संघ बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आज 20 ऑगस्ट रोजी डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृतीदिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून बेळगावचे जीएसटी अप्पर आयुक्त श्री. आकाश चौगुले उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. शिवराज चव्हाण यांनी केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला नीला आपटे यांनी दाभोलकर यांच्यावर आधारित गीत सादर केले. प्राचार्य आनंद मेणसे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. प्रमुख पाहुणे श्री. आकाश चौगुले यांनी आपल्या भाषणात “मानवी जीवनाच्या उत्पत्तीचा आधार घेऊन अंधश्रद्धा” या विषयावर भाष्य केले. वैज्ञानिक शोधांची सुरूवात कशी झाली याचे सविस्तर वर्णन केले. माणुस हा चिकित्सक बुद्धीचा प्राणी आहे. याच चिकीत्सक बुद्धीद्वारेच वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित झाला आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनची स्पष्टता करताना संकुचित दृष्टिकोन व वैज्ञानिक दृष्टिकोन यामधील फरक सांगितला. वैज्ञानिक दृष्टिकोन चे टप्पे स्पष्ट केले. पृथ्वीच्या अस्तित्वाशी निगडित वैज्ञानिक गोष्टींचे संदर्भ हे शास्त्रज्ञ व युरोपियन साहित्यिकांची उदाहरणे देऊन स्पष्ट केले. भारतातील नऊ फिलाॅसाॅफर यांच्या विषयी मांडणी करताना आस्तीक व नास्तीक तत्त्व स्पष्ट केले. चार्वाक व गौतम बुद्ध यांचे वैज्ञानिक दृष्टिकोनाची तत्वे स्पष्ट केली. युरोपियन वैज्ञानिक तत्त्ववेत्ते व भारतीय तत्त्ववेत्ते यांच्यातील वैचारिक परंपराही स्पष्ट केली. अध्यक्षीय भाषणात प्रा. आनंद मेणसे यांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्याचा व डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या योगदानाचा आढावा घेतला. कार्यक्रमाला श्री. शंकर चौगुले, श्री. सुभाष ओऊळकर, ऍड. नागेश सातेरी, अनिल आजगावकर, कृष्णा शहापूरकर, ज्योतीबा आगसमणी, इंद्रजीत मोरे, गजानन सावंत व बेळगाव परिसरातील अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta