
बेळगाव : “32 व्या वर्षाची यशस्वी वाटचाल करीत असलेल्या आदर्श सहकारी सोसायटीने सामाजिक जबाबदारी सांभाळत असतानाच सभासदांच्या हिताचे अनेक निर्णय घेत 1 कोटी 53 लाख 70 हजार रुपयाचा निव्वळ नफा मिळवला आहे हे सांगताना मला अभिमान वाटतो. यामागे संचालकांची एकजूट, कर्मचाऱ्यांची कार्यतत्परता आणि सभासदांनी केलेले सहकार्य कारणीभूत आहे.” असे विचार आदर्श सहकारी सोसायटीचे चेअरमन श्री. एस. एम. जाधव यांनी बोलताना व्यक्त केले.
आदर्श सोसायटीच्या अनगोळ रोड स्थित मुख्य कार्यालयाच्या सभागृहात संस्थेची 32 वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी संपन्न झाली. त्याप्रसंगी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
शेकडो सभासद उपस्थित असलेल्या या सभेची सुरुवात आर्थिक वर्षात दिवंगत झालेल्या सभासदांना सामूहिकरीत्या श्रद्धांजली वाहून करण्यात आली. मुक्तांगण विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी ईशस्तवन व स्वागत गीत सादर केल्यानंतर चेअरमन एस. एम. जाधव, व्हाईस चेअरमन नेमिनाथ कंग्राळकर व सहकाऱ्यांनी दीप प्रज्वलन केले. छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे पूजन करून जाधव यांनी सभासदांचे स्वागत केले. सीईओ पी. बी. माळवी यांच्यासह इन्चार्ज ऑफिसर एस एम मोटर व मुख्य शाखा व्यवस्थापक महेश असोगेकर यांनी व्यासपीठावरील व व्यासपीठासमोरील मान्यवरांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
15 सप्टेंबर 2024 रोजी झालेल्या मागील वर्षाच्या सभेचा वृत्तांत पी बी माळवी यांनी सादर केला.
अहवाल वाचन करताना जाधव यांनी “याही वर्षी सभासदांना वीस टक्के लाभांश देण्याची घोषणा केली. ठेवीदारांचा विश्वास वाढवणारा कारभार केला असल्यामुळे ठेवीमध्ये आणि कर्जामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे” असे सांगून “सर्व व्यवहार डिजिटल पद्धतीने पार पडत आहेत. सभासदांसाठी आरोग्य अपघात विमा सुरू करणे, शिक्षण विषयक कर्ज योजनेत सुधारणा करणे ,सभासद भागधारकांना अधिकाधिक सुविधा देण्याचे प्रयत्न करणे असे उद्देश समोर आहेत “असे सांगितले.
31 मार्च अखेर संस्थेची सभासद संख्या 8339 असून 90 लाखाचे भाग भांडवल आहे .13 कोटी 50 लाखाचा रिझर्व फंड असून 81 कोटी 63 लाखाच्या ठेवी आहेत तर 63 कोटी 92 लाखाची कर्जे वितरित केली आहेत. 33 कोटी 12 लाखाची गुंतवणूक असून यावर्षी 1 कोटी 53 लाख 70 हजार चा निव्वळ नफा झाला आहे. 103 कोटीचे खेळते भांडवल असून एकंदर 313 कोटी 25 लाखाची उलाढाल झाली आहे.” अशी माहिती त्यांनी दिली असता टाळ्यांच्या गजरात त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
ताळेबंद पत्रकाचे वाचन एस एम मोटर यांनी तर नफा – तोटा पत्रकाचे वाचन महेश असोगेकर यांनी केले. अंदाजपत्रक इन्चार्ज ऑफिसर पूजा नेसरकर यांनी सादर केले. अंदाजपत्रकापेक्षा जास्त झालेल्या खर्चास मंजुरी, शिल्लक रकमेचा गुंतवणूक करण्याचा अधिकार संचालकांना देणे बाबत आणि अंतर्गत ऑडिटरची नेमणूक करणे बाबत तसेच रिपोर्ट चे वाचन पी बी माळवी यांनी केले. व्हाईस चेअरमन नेमिनाथ कंग्राळकर यांच्या आभार प्रदर्शनानंतर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
ए एल गुरव, एन आर सनदी, ईश्वर मेलगे, रामकृष्ण पवार, श्रीमती ए. ए साळवी, लक्ष्मण शानभाग, ए सी रोकडे, प्रकाश साळुंखे,अमर फगरे, फत्तेसिंग मुचंडी व अवधूत परब आदि संचालक, सभासद व कर्मचारी वर्ग उपस्थित होता. काही सभासदांनी झालेल्या चर्चेत भाग घेतला. सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे एस एम जाधव व पी बी माळवी यांनी दिली. खेळीमेळीच्या वातावरणात सभा संपन्न झाली.

Belgaum Varta Belgaum Varta