बेळगाव : बेळगाव शहरातील श्री गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी या हेतूने काल शुक्रवारी शहरामध्ये पुन्हा एकदा रॅपिड ॲक्शन फोर्स (आरएएफ) आणि स्थानिक पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांचे लक्षवेधी पथसंचलन (रूट मार्च) झाले.
श्री गणेशोत्सव काळात बेळगाव मधील सार्वजनिक गणपती पाहण्यासाठी शहरातील गणेश भक्तांसह परगावचे नागरिक प्रचंड संख्येने गर्दी करत असतात. या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी घेण्यात येत आहे. पोलीस प्रशासनाकडून सर्वत्र चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्या अनुषंगाने काल शुक्रवारी सकाळी पुन्हा एकदा शहरातील विविध मार्गांवर रॅपिड ॲक्शन फोर्स आणि स्थानिक पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांचे पथसंचलन काढण्यात आले. या रूट मार्चला अर्थात पथसंचलनाला शहरातील राणी कित्तूर चन्नम्मा चौकातून प्रारंभ होऊन काकती वेस, शनिवार खुट, गणपत गल्ली, मारुती गल्ली, हुतात्मा चौक, रामदेव गल्ली, समादेवी गल्ली, यंदे खुट, कॉलेज रोड, धर्मवीर संभाजी महाराज चौक, रामलिंग खिंड गल्ली, टिळक चौक मार्गे हेमुकलानी चौक येथे पथसंचलनाची सांगता झाली.
या पथसंंचालनात खडेबाजार उपविभागाचे एसीपी शेखरप्पा एच., खडेबाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीशैल गावी, वाहतूक दक्षिण विभागाचे पोलीस निरीक्षक बसगौडा पाटील आदींसह शहरातील इतर कांही पोलिस अधिकारी सहभागी झाले होते. दरम्यान, बेळगाव शहरातील नागरिकांनी श्री गणेश चतुर्थीसह श्री गणेशोत्सव शांततेने आणि कोणाच्याही धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाहीत या पद्धतीने सौहार्दपूर्णरित्या साजरा करावा. त्याचप्रमाणे सर्व नियमांचे पालन करून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन शहर पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta