Saturday , January 18 2025
Breaking News

भरतीत मराठी शिक्षकांनाही प्राधान्य द्या : खानापूर युवा समिती

Spread the love


बेळगाव : शिक्षण खात्यातर्फे राज्यात 15 हजार शिक्षकांची भरती केली जाणार आहे या भरतीमध्ये बेळगाव व चिक्कोडी शैक्षणिक जिल्ह्यामध्ये मराठी माध्यमांच्या शिक्षकांना प्राधान्य दिले जावे, अशी मागणी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने एका निवेदनाद्वारे जिल्हा शिक्षणाधिकार्‍यांकडे केली आहे. तसेच मागणीची पूर्तता न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
खानापूर तालुका म. ए. युवा समितचे अध्यक्ष धनंजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज सोमवारी सकाळी उपरोक्त मागणीचे निवेदन जिल्हा शिक्षणाधिकारी मलतवाड यांना सादर करण्यात आले. अधिकारी मलतवाड यांनी निवेदनाचा स्वीकार करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे. शिक्षण खात्यातर्फे राज्यात इयत्ता सहावी ते आठवीपर्यंतच्या वर्गासाठी शिक्षक भरतीची घोषणा करण्यात आली आहे. सदर शिक्षक भरती जिल्ह्यातील गरज लक्षात घेऊन केली जावी, अशी सूचना करण्यात आली आहे. त्यामुळे मराठी माध्यमांच्या शाळांना शिक्षक भरतीमध्ये प्राधान्य दिले जावे. बेळगाव आणि चिक्कोडी शैक्षणिक जिल्ह्यासह सीमाभागात अन्यत्र मोठ्या प्रमाणात मराठीभाषिक विद्यार्थी आहे.
तथापि अलीकडच्या काळात शिक्षकांची कमतरता निर्माण झाली आहे. तेंव्हा यावेळच्या भरतीमध्ये कन्नड बरोबरच मराठी माध्यमांच्या शिक्षकांना प्राधान्य दिले जावे. बेळगाव जिल्ह्यातील सरकारी प्राथमिक शाळांमध्ये शिक्षकांच्या सुमारे 3 हजारांहून अधिक जागा रिक्त आहेत. हे प्रमाण बेळगाव व खानापूर तालुक्यात अधिक आहे.
त्यामुळे येथील मराठी शाळांना अतिथि शिक्षकांवर अवलंबून रहावे लागते. तेंव्हा शिक्षण भरतीमध्ये मराठी माध्यमाच्या शाळांना प्राधान्य दिले जावे, अशा आशयाचा तपशील निवेदनात नमूद आहे. त्याचप्रमाणे सदर मागणीची पूर्तता न झाल्यास जिल्हा शिक्षणाधिकारी तसेच गटशिक्षणाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन छेडण्याचा इशारा खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने दिला आहे.
यासंदर्भात बोलताना युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील म्हणाले की, होऊ घातलेल्या शिक्षक भरतीमध्ये बेळगाव व खानापूर तालुक्याचा संपूर्ण सीमाभागातील मराठी भाषिक शिक्षकांना प्राधान्य दिले जावे अशी आमची मागणी आहे. अलीकडच्या काळात शिक्षकांच्या कमतरतेमुळे विद्यार्थ्यांचे फार मोठे नुकसान होत आहे. त्याचप्रमाणे शिक्षणाचे राष्ट्रीय धोरण आहे त्यानुसार पाचवी पर्यंतचे शिक्षण मातृभाषेत अनिवार्य केले आहे. यासाठी मराठी माध्यमाच्या शिक्षकांना प्राधान्य द्यावे अशी आमची मागणी आहे. जर या मागणीची दखल घेण्यात आली नाही तर जेथे जेथे गटशिक्षणाधिकारी कार्यालय आहे तेथे ठिय्या आंदोलन छेडले जाईल असा इशारा आम्ही दिला आहे, असे पाटील यांनी सांगितले.
खानापूरच्या विद्यमान लोकप्रतिनिधी या काँग्रेसच्या आहेत आणि राज्यातील सरकार भाजपच्या आहे. नेतेमंडळी मराठीचा कळवळा दाखवतात मात्र कृती काहीच करत नाहीत असे सांगून खानापूर तालुका म. ए. समितीचे नेते माजी आमदार अरविंद पाटील हे भाजपवासिय झाले आहेत. समितीमध्ये नसले तरी त्यांनी मराठी माध्यमाच्या शिक्षकांच्या भरतीसाठी प्रयत्न करावेत.
भाजप सत्ताधारी असल्यामुळे त्यांचे प्रयत्न एक मराठी भाषिक म्हणून वावगे ठरणार नाहीत, असेही धनंजय पाटील यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी बेळगाव तालुका म. ए. युवा आघाडीचे अध्यक्ष संतोष मंडलिक आणि आंबेवाडी ग्रा. पं. अध्यक्ष चेतन पाटील यांच्यासह नारायण सरदेसाई, राजू पाटील, बळीराम पाटील, विनायक सावंत, गोपाळ देसाई, सुरेश देसाई, राजाराम देसाई, महेश धामणेकर, कांतेश चलवेटकर आदी खानापूर युवा समितीचे अन्य पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

उद्यापासून सार्वजनिक वाचनालयाची बॅ. नाथ पै व्याख्यानमाला

Spread the love  बेळगाव : 176 वर्षाची परंपरा असलेल्या येथील सार्वजनिक वाचनालय, या संस्थेच्यावतीने आयोजित …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *