
बेळगाव : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे मुंबई येथे पाच दिवसापासून उपोषणाला बसले होते. त्यांच्या या लढ्याला अभूतपूर्व यश मिळाल्याबद्दल बेळगाव सकल मराठा समाजाच्यावतीने धर्मवीर संभाजी चौक येथे आज आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या या लढ्याला मंगळवारी यश आले. महाराष्ट्र सरकारने जरांगे पाटील यांच्या मागण्यांना मान्यता दिली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे महाराष्ट्रसह बेळगाव येथील मराठा समाजाने आनंदोत्सव साजरा केला. धर्मवीर संभाजी चौकातील छत्रपती संभाजी महाराज यांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. “एक मराठा लाख मराठा, छत्रपती शिवाजी महाराज की जय” अश्या घोषणा देत मिठाईचे वाटप करून फटाक्यांची आतषबाजी करण्यात आले.
यावेळी मराठा समाजाचे सीमाभाग समन्वयक प्रकाश मरगाळे, माजी महापौर मालोजीराव अष्टेकर, रमाकांत कोंडुस्कर, गुणवंत पाटील, रणजीत चव्हाण पाटील, दलित नेते मोहन तळवार यांच्या हस्ते धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी बोलताना म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील मागील दोन वर्षापासून लढा देत आहेत. जरांगे पाटलांच्या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी बेळगावमधून मराठा समाजाचे बांधव मुंबई येथे जाऊन आंदोलनाला पाठिंबा दर्शविला होता. आझाद मैदानावर उपोषणस्थळी प्रचंड पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. उपोषण स्थळी कोणालाही आत सोडले जात नव्हते मात्र बेळगाव येथून सीमावासिय मराठी बांधव तसेच महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते आल्याचे समजतात मनोज जरांगे पाटील यांनी समिती शिष्टमंडळाला बोलावून घेऊन खास भेट घेतली. या भेटीप्रसंगी केवळ उपोषण व आरक्षणासंदर्भात चर्चा केली नाही तर प्रलंबित असलेल्या सीमाप्रश्नासंदर्भात देखील रमाकांत कोंडुस्कर व त्यांच्या शिष्टमंडळाशी चर्चा केली. सीमा भागातील 865 मराठी गावातील जनतेवर कर्नाटक प्रशासनाकडून अन्याय होत आहे. सीमा भागातील मराठी भाषा नामशेष करण्याचा कशाप्रकारे प्रयत्न केला जात आहे. याबाबत रमाकांत कोंडुस्कर यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केली.
यावेळी मालोजी अष्टेकर, रवी साळुंखे, प्रकाश मरगाळे, मोहन तळवार आदींची भाषणे झाली.
आनंदोत्सवाला मराठा समाजाचे बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta