बेळगाव : गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनीच्या वतीने बेळगाव सीमा भागातील तसेच चंदगड तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक विद्यार्थ्यांसाठी दिनांक 9 सप्टेंबर रोजी विज्ञान कथाकथन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे व दिनांक 24 ते 26 सप्टेंबर यादरम्याने विज्ञान व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. मानवतावादी लक्ष्मणराव ओऊळकर यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा व व्याख्यानमाला होणार आहे. लक्ष्मणराव ओऊळकर यांची बेळगाव परिसरातील सामाजिक कार्यकर्ते तसेच अंधश्रद्धा, अनिष्ट रूढी व परंपरा यांच्या विरोधात आवाज उठविणारे कार्यकर्ते म्हणून ओळख होती. बहुजन समाजाच्या उद्धारासाठी त्यांनी अनेक सामाजिक व शैक्षणिक कामे केली होती. वैज्ञानिक दृष्टिकोन हा त्यांच्या कामाचा मुख्य गाभा होता आणि म्हणूनच त्यांच्या स्मरणार्थ त्यांच्या नावे ही स्पर्धा व व्याख्यानमाला घेण्यात येणार आहे. 9 सप्टेंबर रोजी होणाऱ्या स्पर्धेमध्ये प्राथमिक व माध्यमिक गटाच्या विद्यार्थ्यांनी विज्ञान कथाकथन सादर करायचे आहे यामधून प्रत्येकी तीन विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना रोख रकमेचे पारितोषिक देण्यात येणार आहे. दि. 24 सप्टेंबरपासून विज्ञान व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले असून पहिल्या दिवशी डॉ. हमीद दाभोलकर यांचे “वैज्ञानिक दृष्टीकोन व जाणीवा” या विषयावरील व्याख्यान होईल. 25 सप्टेंबर रोजी मराठी विद्यानिकेतनचे माजी विद्यार्थी बेळगाव मधील आयकर विभागाचे आयुक्त IRS आकाश चौगुले व एरोनॉटिक्स इंजिनियर राहुल पाटील यांचे ‘मातृभाषेतून शिक्षण व माझी यशोगाथा’ या विषयावरील व्याख्यान होईल. व 26 सप्टेंबर रोजी पुण्यातील सामाजिक कार्यकर्त्या मुक्ता चैतन्य यांचे ‘डिजिटल माध्यमांचे दुष्परिणाम व पालकांची भूमिका’ या विषयावरचे व्याख्यान होणार आहे. त्यामुळे कथाकथन स्पर्धांमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन आपल्या कथा सादर कराव्यात तसेच व्याख्यानमालेतही पालकांनी सहभागी व्हावे असे आवाहन प्रबोधिनीचे अध्यक्ष जयंत नार्वेकर व सचिव सुभाष ओऊळकर यांनी केले आहे. सदर स्पर्धा ही मराठी विद्यानिकेतन शाळेच्या सभागृहात होईल नाव नोंदणीची अंतिम तारीख सात सप्टेंबर असेल, असे बैठक घेऊन ठरविण्यात आले आहे.
या बैठकीला प्रबोधिनीचे सदस्य प्रा. आनंद मेणसे, प्रा.सुरेश पाटील, इंद्रजित मोरे, नीला आपटे, बी. बी. शिंदे, बी.जी. पाटील, नारायण उडकेकर, सविता पवार, गजानन सावंत, धिरजसिंह राजपूत, गौरी चौगुले, स्नेहल पोटे व प्रसाद सावंत उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta