बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील पोलिसांनी केलेल्या एका मोठ्या कारवाईमुळे नऊ गुन्ह्यांची उकल झाली आहे. या कारवाईत पोलिसांनी सोनेचोरी करणाऱ्या एका आंतरराज्य टोळीला अटक केली. याबद्दलची सविस्तर माहिती आज पोलिस अधीक्षक डॉ. भीमाशंकर एस. गुळेद यांनी पत्रकार परिषदेत दिली.
अथणी तालुक्यातील ऐगळी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हालळ्ळी गावात गौरवा बसप्पा कळशेट्टी यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने दुचाकीवरून आलेल्या दोन आरोपींनी हिसकावून पळ काढला होता. या प्रकरणी ऐगळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानुसार पोलिसांनी अथक प्रयत्नांनी महाराष्ट्रातील मिरज तालुक्यातील लिंगनूर गावातील तीन आरोपींना अटक केली. या आरोपींनी ऐगळी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ४, अथणी २, रायबाग १, कुडची १ आणि मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील १ अशा एकूण ९ गुन्ह्यांची कबुली दिली आहे. त्यांच्याकडून गुन्ह्यांसाठी वापरण्यात आलेल्या १,८०,००० रुपये किमतीच्या दोन दुचाकी आणि ६,००,००० रुपये किमतीचे ६० ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. उर्वरित गुन्ह्यांमधील सोन्याचे दागिने जप्त करण्याची प्रक्रिया सुरू आहे अशी माहिती पोलिस अधीक्षक डॉ. भीमाशंकर एस. गुळेद यांनी पत्रकार परिषदेत दिली. याचप्रमाणे अथणी शहरात त्रिमूर्ती ज्वेलर्समध्ये दोन जणांनी दुकान मालकाला पिस्तुलाचा धाक दाखवून सोन्याची लूट करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी अथणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सीसीटीव्ही फुटेज वगळता आरोपींबद्दल कोणताही सुगावा नसतानाही, पोलिसांनी सतत प्रयत्न करून दोन आरोपींना अटक केली. विजय उर्फ बबलु संजय जावीर आणि यशवंत उर्फ ओमकार गोपीनाथ गुरव अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची आहेत. त्यांच्याकडून गुन्ह्यासाठी वापरण्यात आलेली २ पिस्तूल, ७ जिवंत काडतुसे, महिंद्रा एक्सयूवी-५०० कार आणि एक दुचाकी जप्त करण्यात आली आहे.पोलिस अधीक्षक डॉ. भीमाशंकर एस. गुळेद, अतिरिक्त पोलिस अधीक्षक रामगोंडा बी. बसरगी, डीएसपी प्रशांत मुन्नोळी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अथणीचे सीपीआय संतोष डी. हळ्ळूर यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. तपास पथकात पीएसआय कुमार हाडकर (ऐगळी), सी.बी. सागनुरी (ऐगळी), मल्लिकार्जुन तळवार (अथणी), जी.एस. उप्पार (अथणी) आणि आर.एस. खोत (कागवाड) यांच्यासह तपास पथकात पी.बी. नाईक, पी.एन. कुरी, ए.ए. ईरकर, बी.बी. पाटील, जे.एच. डांगे, ए.ए. मायगूर, डी.आय. धरिगौडर, व्ही.व्ही. गायकवाड, जी.ए. गुरमठ, डी.टी. शनावाड, एस.सी. पुजारी, एस.ए. शेख, पी.सी. केंटिगोंड, प्रशांत आलहट्टी आणि तांत्रिक विभागाचे विनोद टक्कन्नवर यांचा समावेश होता. या कामगिरीबद्दल पोलिस अधीक्षकांनी या कारवाईत सहभागी असलेल्या सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे त्यांनी कौतुक केले.
Belgaum Varta Belgaum Varta