Monday , December 8 2025
Breaking News

लक्ष्मीकांत देशमुख यांना सार्वजनिक वाचनालयाचा पुरस्कार प्रदान

Spread the love

 

बेळगाव : “आचार्य अत्रे हे आभाळाएवढे मोठे साहित्यिक होते. ते साहित्य सम्राट होते. अत्रे म्हणजे चिरंतन मूल्ये जपणारा साहित्यिक काव्याचा जनक” असे विचार अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष तथा ज्येष्ठ साहित्यिक श्री. लक्ष्मीकांत देशमुख यांनी बोलताना व्यक्त केले.
येथील सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने रविवारी आचार्य अत्रे साहित्य पुरस्कार श्री. देशमुख यांना देऊन सन्मानित करण्यात आले. वाचनालयाच्या सभागृहात संपन्न झालेल्या या कार्यक्रमात वाचनालयाचे अध्यक्ष अनंत लाड यांनी त्यांना हा पुरस्कार बहाल केला. पंचवीस हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह आणि प्रशस्तीपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
“आचार्य अत्रे यांचे भाषा समाज आणि संस्कृती बाबतचे योगदान” या विषयावर बोलताना देशमुख यांनी अत्रे यांच्या साहित्यिक सामाजिक चळवळीचा आढावा घेतला. ते पुढे म्हणाले की, “सीमा प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी अत्रे यांनी लढा दिला. भाषावार प्रांतरचना हा प्रत्येकाचा अधिकार आहे या मताचे ते होते. एक लेखक आपल्या वाणी आणि लेखणीच्या बळावर काय करू शकतो हे अत्रे यांनी दाखवून दिले आहे. सामान्य लोकांच्या प्रबोधनाचे प्रभावी माध्यम म्हणजे लोककला आहे हे लक्षात घेऊन त्यांनी अनेक नाटके दिली. घराबाहेर, उद्याचा संसार, जग काय म्हणेल? ही त्यांची तीन नाटके स्त्रीवादी होती. 1953 साली तयार झालेला ‘श्यामची आई’ हा असा पहिला चित्रपट आहे की ज्याला राष्ट्रीय पारितोषिक मिळाले. त्यानंतर तब्बल 40 वर्षांनी श्वास या मराठी चित्रपटाला सुवर्णपदक मिळालं. अत्र्यांची स्वतःची अशी एक विशिष्ट वांग्मयीन भूमिका होती. ती सर्वसमावेशक व बहुजन हिताची होती. बहुजन समाजात वैचारिक क्रांती घडवून आणणे हे साहित्यिकांचे कर्तव्य आहे. समाजाच्या दुःखाचे निदान करणारे साहित्य म्हणजे पुरोगामी साहित्य होय” असे सांगून ते म्हणाले की “लेखकाला सहानुभूती असली पाहिजे. स्त्रियांनी शिकावं, संसार चांगला करावा, मुलांकडे लक्ष द्यावं अशी तत्कालीन समाज सुधारकांची दृष्टी होती मात्र स्त्रियांचा विकास झाला पाहिजे या विचाराचे अत्रे होते.”
ते पुढे म्हणाले की, “माणसाचं जगणं आज-काल कठीण होत चालल आहे अशा परिस्थितीत अत्रे यांचे साहित्य प्रेरणा देणार आहे. अत्रे बंडखोर होते पण अतिशय कर्तृत्ववान व नम्रही होते त्यांनी सदगुणांची उपासना केली. जग पाहायला दृष्टी लागते, माणसं जोडायला कला लागते त्या कलेतूनच दृष्टी येते. मनाच्या कक्षा जेव्हा रुंदावतात तेव्हाच लेखक मोठा होतो असे अत्रे म्हणायचे “असे ते म्हणाले.
प्रारंभी वाचनालयाचे अध्यक्ष अनंत लाड यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले. आणि देशमुख यांना पुरस्कार बहाल केला.
वाचनालयाचे उपाध्यक्ष डॉ. विनोद गायकवाड यांनी देशमुख सरांच्या साहित्य सेवेचा परिचय करून दिला. संचालक प्रसन्न हेरेकर यांनी आभार प्रदर्शन केले तर कार्यवाह सुनिता मोहिते यांनी सूत्रसंचालन केले.
कार्यक्रमास वाचनालयाचे सर्व संचालक, कर्मचारी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

टिळकवाडी येथील न्यू शिवाजी कॉलनीतील परिसर बनला कचरा डेपो!

Spread the love  बेळगाव : मंत्री महोदय येती गावा, तोची दिवाळी दसरा अशी काहीशी स्थिती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *