कागवाड : कागवाड तालुक्यातील उगार बुद्रुक गावातील सात महिन्यांची गरोदर असलेल्या चैताली प्रदीप किरणगी (२२) हिचा संशयास्पद मृत्यू झाला असून तिचा पती प्रदीप यानेच तिचा खून केला असल्याचा आरोप चैतालीचे वडील अण्णासाहेब माळी यांनी केला आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, प्रदीप आणि चैताली एकाच गावाचे रहिवासी. अनेक वर्षांच्या प्रेमसंबंधानंतर त्यांचे लग्न झाले होते. चैताली सात महिन्यांची गरोदर होती. पती प्रदीप तिला वारंवार त्रास देत होता आणि जीवे मारण्याची धमकीही देत होता, असे तिने माहेरच्यांना सांगितले होते, असे तिच्या कुटुंबीयांनी पोलिसांना सांगितले. रविवारी (७ सप्टेंबर) पती प्रदीप चैतालीला दुचाकीवरून रुग्णालयात घेऊन जात होता. शिरगुप्पी गावाजवळ त्याने गाडी थांबवली. त्याचवेळी पाठीमागून आलेल्या एका कारने चैतालीला धडक दिली. या धडकेत ती रक्ताच्या थारोळ्यात पडली. पतीने तिला त्याच कारमधून मिरजेतील एका खासगी रुग्णालयात नेले. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. हा अपघात नसून, चैतालीचा खून करण्यात आला असून, पुरावा नष्ट करण्यासाठी अपघाताचा बनाव रचला गेला असल्याचा संशय तिच्या वडिलांनी व्यक्त केला आहे. त्यांनी सोमवारी (८ सप्टेंबर) कागवाड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
या तक्रारीवरून पोलिसांनी पती प्रदीप, कार चालक आणि कारला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. पोलीस उपअधीक्षक रामनगौडा बसरगी, डीवायएसपी प्रशांत मुन्नोळी, सीपीआय संतोष हळ्ळूर आणि पीएसआय राघवेंद्र खोत यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta