दावणगिरी : श्रीराम सेनेतर्फे प्रांत अभ्यास वर्गाचे रविवार. दि. 14 सप्टेंबर रोजी दावणगिरी येथे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला सर्व प्रांतांमधून हजारो कार्यकर्त्यांची उत्स्फूर्त उपस्थिती होती. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. प्रमोदजी मुतालिक यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमात संघटनेची माहिती, कार्यपद्धती व भविष्यातील रुपरेषा ठरविण्यात आली. यावेळी नवीन पदाधिकाऱ्यांची निवडही करण्यात आली.
उत्तर कर्नाटक राज्य अध्यक्ष म्हणून श्री. रविकुमार कोकितकर, उपाध्यक्षपदी श्री. विनय आंग्रोळी, महाराष्ट्रातून कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष म्हणून श्री. महांतेश देसाई तसेच चंदगड तालुका अध्यक्षपदी श्री. तुकाराम मरगाळे यांची निवड करण्यात आली.
या प्रसंगी सर्व कार्यकर्त्यांत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
रविकुमार कोकितकर यांच्याकडे श्रीराम सेनेच्या उत्तर कर्नाटक अध्यक्षपदाची धुरा
हिंडलगा (ता. बेळगाव) येथील श्री. रविदादा कोकितकर यांची श्रीराम सेनेच्या उत्तर कर्नाटक अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. कार्यकर्त्यांच्या दीर्घकाळच्या इच्छेला आज मूर्त रूप मिळाले असून, लाखो हिंदुत्वनिष्ठांच्या मनातील आनंद द्विगुणीत झाला आहे.
रविदादा कोकितकर यांचा जन्म एका साध्या कुटुंबात झाला. “देव, देश व धर्माचे रक्षण” हेच आपले जीवनध्येय मानून त्यांनी आयुष्य घडवले. शिक्षण पूर्ण झाल्यावर स्वतःचा हॉटेल व्यवसाय सांभाळत त्यांनी सामाजिक व धार्मिक कार्यालाही समान प्राधान्य दिले.
त्यांचा कार्यप्रवास बजरंग दलामध्ये कार्यकर्ता म्हणून सुरू झाला. त्यानंतर ते बेलगाव पश्चिम विभागीय अध्यक्ष म्हणून सक्रिय झाले. लव्ह जिहाद, धर्मांतर व धर्मविरोधी कारवायांचा पर्दाफाश करण्याचे काम त्यांनी युद्धपातळीवर केले. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना बेळगाव तालुका अध्यक्षपद देण्यात आले.
हिंदुराष्ट्र सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष धनंजय देसाई यांनी त्यांच्या कार्याचे कौतुक करून त्यांच्यावर कर्नाटक राज्याची जबाबदारी सोपवली होती. गो-रक्षण, समाजसेवा आणि लव्ह जिहादाविरुद्ध लढ्यात त्यांनी प्राण पणाला लावून काम केले. हजारो गाई कत्तलीपासून वाचवणे, मुलींना लव्ह जिहादच्या जाळ्यातून सोडवणे आणि हजारो कार्यकर्त्यांना धर्मकार्याची प्रेरणा देणे ही त्यांची उल्लेखनीय कामगिरी आहे.
यानंतर श्रीराम सेनेच्या बेळगाव जिल्हा अध्यक्षपदी व पुढे तीन जिल्ह्यांचे विभागीय अध्यक्षपदी त्यांची निवड झाली. छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा, स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार आणि कार्यकर्त्यांच्या प्रबळ इच्छेमुळे अखेर राष्ट्रीय अध्यक्ष श्री. प्रमोद मुतालिक यांनी त्यांची उत्तर कर्नाटक अध्यक्षपदी नियुक्ती केली.
ही नियुक्ती जाहीर होताच उत्तर कर्नाटकात कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, हिंदुत्वाचा झेंडा आणखी उंच नेण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta