बेळगाव : निलजी येथील रणझुंझार को-ऑप. क्रेडिट सोसायटी व रणझुंझार मल्टीपर्पज सौहार्द सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा व त्या निमित्ताने आयोजित केलेला सभासदांच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुण गौरव सोहळा असा संयुक्त समारंभ रणझुंझार हायस्कूलच्या कै. अशोकराव मोदगेकर सभागृहात उत्साही वातावरणात नुकताच पार पडला.
यावेळी हलकर्णी येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या प्राध्यापिका डॉ. सरिता मोटराचे प्रमुख वक्त्या या नात्याने बोलताना पुढे म्हणाल्या की, पाचवीला आपले नशीब शटवाई लिहिते म्हणून आपण गप्प राहीलो तर जीवन व्यर्थ जाईल. तेव्हा प्रचंड कष्ट घ्यायची तयारी ठेवा. उच्च ध्येय पहा. सतत सराव करा. प्रतिकूल परिस्थितीकडे बोट न दाखवता आपल्याच प्रश्नांची आपणच उत्तरे शोधा तर नक्कीच तुमच्या हातून इतिहास घडेल आणि जीवन सार्थकी लागेल. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विठ्ठल पाटील होते तर व्यासपीठावर प्रमुख पाहुण्या म्हणून रणझुंझार शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा विमलताई मोदगेकर उपस्थित होत्या.
प्रारंभी रणझुंझार सौहार्द सोसायटीचे संचालक मल्लाप्पा भरमा गोमाण्णाचे आणि दिवंगत सभासदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. रणझुझार हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी ईशस्तवन गायले व स्वागत गीत सादर करून उपस्थितांचे स्वागत केले. प्राध्यापिका डॉ. सरिता मोटराचे, संस्थेचे मार्गदर्शक रामचंद्र मोदगेकर, संचालक गुंडू पाटील, सिद्राय वर्पे व इतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. सौहार्द सोसायटीचे संचालक महेश मोदगेकर यांच्या हस्ते सरस्वती देवीच्या प्रतिमेची पूजन तर रणझुंझार क्रेडिट सोसायटीचे संचालक कल्लाप्पा कोलकार यांनी संस्थेचे संस्थापक स्वर्गीय अशोकराव मोदगेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. रणझुंझार शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा विमलताई मोदगेकर व सौ. चंदा गाडेकर यांच्या हस्ते प्राध्यापिका डॉ. सरिता मोटराचे यांचा सन्मानन चिन्ह देऊन आणि शाल, पुष्पहार घालून संस्थेच्या वतीने स्वागत करण्यात आले.
तसेच दहावी आणि बारावीच्या गुणी विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम व सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले. विठ्ठल पाटील यांनी अहवाल वाचन करून संस्थेच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेताना सांगितले की, संस्थेचे ३२०० सभासद असून वसूल भाग भांडवल ८८ लाख ३५ हजार इतके आहे. संस्थेकडे वेगवेगळ्या ठेव योजना मधून रुपये २१ कोटी ५६ लाख ८ हजार १३३ रुपयेच्या ठेवी जमा झालेल्या आहेत. इतर संस्थांमध्ये रुपये ७ कोटी ३२ लाख ६६ हजार ६२९ इतकी गुंतवणूक केलेली आहे. सभासदांना वेगवेगळ्या कर्ज प्रकारानुसार रुपये १७ कोटी ६८ लाख ८९ हजार १४६ रुपये इतके कर्ज वाटप केलेले आहे. संस्थेकडे रुपये २ कोटी ८० लाख ५२ हजार २३१ रुपये इतका राखीव व इतर निधी आहे. वार्षिक उलाढाल ५६ कोटी ९४ लाख ९० हजार इतकी झालेली आहे. तसेच संस्थेने वर्षा अखेरीस रुपये ३० लाख ५१ हजार ४१४ चा नफा मिळून सभासदांना १२% लाभांश देण्याचे घोषित केले. याचबरोबर संस्थेने केलेल्या सामाजिक व शैक्षणिक कार्याचा उल्लेख करून सभासदांनी आपल्यावर दाखविलेल्या विश्वासाबद्दल आभार व्यक्त केले. तसेच रणझुंझार मल्टीपर्पज सौहार्द सोसायटीचे अध्यक्ष रमेश मोदगेकर यांनी सौहार्द सोसायटीचा अहवाल सादर करून संस्थेला रुपये ८ लाख ३० हजार ५५० चा नफा झाल्याचे सांगितले.
यावेळी संस्थेचे संचालक अमर मोदगेकर, निर्मला गोमाण्णाचे, यल्लाप्पा मोदगेकर, परशराम पाटील, उज्वला पाटील, भाऊसाहेब मोदगेकर आणि बहुसंख्य सभासद, हितचिंतक व कर्मचारी उपस्थित होते. व्हा. चेअरमन निखिल मोदगेकर यांनी आभार मानले. सूत्रसंचालन कपिल पाटील आणि प्रास्ताविक सिद्धाप्पा जत्राटी यांनी केले.
Belgaum Varta Belgaum Varta