बेळगाव (वार्ता) : कर्नाटक सरकारच्यावतीने जातीनिहाय जनगणना दि. 22 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबर 2025 पर्यंत करण्यात येणार आहे. यावेळी सर्व मराठा समाजातील नागरीकांनी धर्म- हिंदू, जात- मराठा, पोटजात- कुणबी आणि मातृभाषा- मराठी अशी नोंद करावी. याची जनजागृती करण्यासाठी रविवार दि. 21 रोजी सायं. 6 वा. रॅली आयोजित करण्यात आली आहे. त्याच बरोबर सकल मराठा समाज्याच्यावतीने रविवारी मराठा मंदिर बेळगाव येथे ५ वाजता आयोजित केलेल्या मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचा निर्धार महाराष्ट्र एकीकरण समिती येळ्ळूरच्या बैठकीत व्यक्त करण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य श्री. वामनराव पाटील हे होते.
प्रारंभी प्रकाश अष्टेकर यांनी कुणबी-मराठा नोंदी केल्याने मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षण आणि नोकरीत अनेक फायदे होणार आहेत. म्हणून युवकांनी सदर नोंदीसाठी विभागवार कमिट्या कराव्यात असे सांगितले. माजी ग्रामपंचायत उपाध्यक्ष दुद्दापा बागेवाडी मराठा समाजाला आरक्षणचा भविष्यात फायदा होणार असल्यामुळे कुणीबी-मराठा नोंद अत्यावश्यक असल्याचे सांगितले. युवानेते दत्ता उघाडे यांनी सकल मराठाच्या माध्यमातून हे कार्य करण्यात येणार असल्याचे सांगितले. माजी ग्रामपंचायत सदस्य राजू पावले, बंडू देसाई, उदय जाधव यांचही भाषणे झाली.
या बैठकीत म. ए. समितीचे कार्यकर्ते बंडू देसाई यांची बेळगाव तालुका मार्केटिंग सोसायटीच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल शाल व श्रीफल देऊन सत्कार करण्यात आला.
या बैठकीला माजी तालुका पंचायत सदस्य चांगदेव परीट, दौलत पाटील, शिवाजी सायनेकर, शिवाजी कदम, आनंद कंग्राळकर, भोला पाखरे, सुरज गोरल, बाळू धामणेकर, कृष्णा बिजगरकर, गणेश अष्टेकर, शुभम जाधव, संदीप मेलगे, पप्पू माणकोजी, रामा पाखरे आदि बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. माजी ग्रामपंचायत सदस्य प्रकाश पाटील यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta