
बेळगाव : कर्नाटक सरकारच्या शैक्षणिक आणि सामाजिक सर्वेक्षण पत्रकात मराठा समाजातील लोकांनी धर्म, जात, पोटजात आणि मातृभाषा कशाप्रकारे नमूद करावी यासंदर्भात सकल मराठा समाज आणि मराठा समाजातील नेते मंडळींकडून जनजागृती करण्यात येत आहे. या अनुषंगाने मराठा समाजाचे युवा नेते किरण जाधव यांनी आज कपिलेश्वर कॉलनी, शास्त्रीनगर, गुडशेड रोड यासह आसपासच्या परिसरात यासंदर्भात जनजागृती केली.
त्यांनी या भागातील मराठा समाजातील लोकांच्या गाठीभेटी घेऊन जातनिहाय जनगणना पत्रकात धर्म हिंदू, जात मराठा, पोट जात कुणबी आणि मातृभाषा मराठी असे नमूद करण्याचे आवाहान केले. यावेळी त्यांनी या संदर्भातील नमुना पत्रकांचे वाटप केले.
पान नंबर 5 वरील अनुक्रमणिका 8 मध्ये धर्म हिंदू, अनुक्रमणिका 9 मध्ये जात मराठा, अनुक्रमणिका 10 मध्ये पोट जात कुणबी तर पान नंबर 6 वरील अनुक्रमणिका 15 मधील क्रमांक 6 मध्ये मातृभाषा मराठी असा उल्लेख करावा असे किरण जाधव यांनी याविषयीच्या प्रसार आणि प्रचारादरम्यान सांगितले.
शिक्षणात आरक्षण सवलती मिळण्यासाठी, सरकारी नोकरीत आरक्षण लागू होण्यासाठी तसेच सरकारी योजनेत लाभार्थी होण्यासाठी मराठी समाज बांधवांना ही शैक्षणिक आणि सामाजिक सर्वेक्षण नोंद उपकारक ठरणार असल्याचे यावेळी बोलताना किरण जाधव यांनी सांगितले.

Belgaum Varta Belgaum Varta