
बेळगाव : शहरातील कपिलेश्वर मंदिराच्या माजी अध्यक्ष पुजारी यांच्या मुलाने मोबाईलमध्ये “डेथ नोट” लिहून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना कपिलेश्वर रोड येथील एका घरात घडली आहे. सिद्धांत पुजारी (वय 27) असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे.
मागील तीन वर्षांपूर्वी सिध्दांत याच्यावर खोट्या बलात्काराचा गुन्हा नोंद केला होता या नैराश्येतून त्याने हे टोकाचे पाऊल उचलले आहे. सिध्दांतने मृत्यूपूर्वी आपल्या मोबाईलमध्ये आत्महत्येचे कारण स्पष्ट केले असून “मी कोणत्याही मुलीसाठी माझे जीवन संपवत नाही तर आलिशान जीवन जगता येत नसल्यामुळे मी आत्महत्या करीत आहे, गणपतीच्या वेळीच मला मारायचे होते, परंतु गणपती मोठा सण साजरा करून मरावे, असा विचार करून मी थांबलो.”. आत्महत्येसाठी कारणीभूत असलेल्या घटनेचा देखील त्याने उल्लेख केला आहे. “मी कपिलेश्वर मंदिरात पुजारी म्हणून काम करीत होतो परंतु तीन वर्षांपूर्वी माझ्यावर बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करून मंदिरातून बाहेर काढण्यात आले. तेव्हापासून माझे आयुष्य उध्वस्त झाले” असे त्याने मृत्यूपूर्वी मोबाईलमध्ये लिहिले आहे. या आरोपामुळे स्थानिक नागरिकांमध्ये व मंदिर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मृत्यूपूर्वी सिद्धांतने डेथनोटमध्ये कुटुंबीयांना भावनिक आवाहन देखील केले आहे की, “माझ्या श्राद्धाला मटण बनवू नका, आजी वारली होती त्यावेळेस मटण बनवले होते पण माझ्या श्राद्धाला ते बनवू नका, त्या ऐवजी तुम्ही इतर पदार्थ बनवा. मी मेल्यानंतर कोणीही रडू नका, तुम्ही रडल्यास माझ्या आत्म्याला त्रास होईल, असे त्यांनी नमूद केले आहे. तसेच मी मेल्यावर जेव्हा देवांना भेटेन तेव्हा मला त्रास देणाऱ्यांना मारण्यासाठी सांगेन” असे त्याने यामध्ये नमूद केले आहे.
सदर घटनेची माहिती मिळताच खडेबाजार पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि या प्रकरणाचा पुढील तपास सुरू केला. सिद्धांतच्या मोबाईलमधील “डेथनोट” तपासण्यासाठी पोलिसांनी मोबाईल ताब्यात घेतला आहे. तीन वर्षांपूर्वीच्या घटनेच्या मनस्तापाने सदर तरुणाने आत्महत्या केली असून या प्रकरणाची सखोल चौकशी करून आपल्या मुलाला न्याय द्यावा, अशी मागणी कुटुंबीयांनी केली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta