Wednesday , March 4 2026
Breaking News

संजीवीनी फाउंडेशन आयोजित उमंग – २०२५ मध्ये उद्या गुरुवर्य इंद्रजीत देशमुख यांचे व्याख्यान…

Spread the love

 

सर्वगुण संपन्न सर्वांगसुंदर व्यक्तिमत्त्व : आदरणीय गुरुवर्य इंद्रजीत देशमुख काकाजी.’

सांगली जिल्ह्यातील विटा शहराजवळच्या माहुली या छोट्याशा गावी श्री. दत्ताजीराव भाऊसाहेब देशमुख व सौ.विजयालक्ष्मी दत्ताजीराव देशमुख या पुण्यशील दाम्पत्याच्या पोटी आठ लेकरं जन्मली. म्हणतात ना…”शुद्ध बिजापोटी फळे रसाळ गोमटी.” तशी ही लेकरं. आणि त्यातले रसाळ गोमटे शेंडेफळ म्हणजे परमपूज्य गुरुवर्य इंद्रजीत देशमुख (काकाजी) ऊर्फ वासुदेवानंद सरस्वती. काकाजींना तीन भाऊ व पाच बहिणी अशी एकूण आठ भावंडे. एकंदरीत मोठा परिवार. १९ ऑक्टोबर १९६५ रोजीचा काकाजींचा जन्म.. आज सर्व आबालवृद्ध आदराने व मायेने त्यांना काकाजी म्हणून संबोधतात.. आई विजयालक्ष्मी देशमुख जुनी अकरावी पास असलेल्या तर वडील श्री. दत्ताजीराव भाऊसाहेब देशमुख १० वर्षे आमदार होते. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र व्हावा म्हणून प्रथम ज्या दोन आमदारांनी त्यावेळी राजीनामा दिला, त्यापैकी एक काकांजीचे वडील होते. काकाजींच्या वडिलांनी सन १९४५ च्या दरम्यान आपल्या लग्नात स्वतःची ७२ एकर जमीन व मिळालेला आठ हजार रुपये हुंडा त्यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या रयत शिक्षण संस्थेला दान स्वरूपात दिला. सामाजिक ऋणानुबंधाच्या दृढतेसाठी केंद्राला स्वमालकीची जागा देऊन माहुलीमध्ये पोस्ट ऑफिस सुरू करणारे काकजींचे देशमुख कुटुंब हे देशातील पहिले कुटूंब होय. १९८२ साली देशमुख कुटुंबाच्याच प्रयत्नाने बँक ऑफ बरोडा या शाखेची स्थापना माहुली या ठिकाणी करण्यात आली. अशा समाजाप्रती उदात्त कळवळा असणाऱ्या समाजसेवी कुटुंबातच काकाजींवर समाजशीलतेचा संस्कार रुजला. काकाजींचे भाग्य मोठे की असे उदार अंतःकरणाचे मायबाप त्यांना लाभले.
काकाजींचे प्राथमिक शिक्षण गावच्या जिल्हा परिषद शाळेत तर माध्यमिक शिक्षण रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा गांधी विद्यालय माहुली या ठिकाणी झाले. बळवंत कॉलेज विटा येथून बारावी झाल्यानंतर कोल्हापूर येथे बी.एस्सी. ऍग्री व त्यानंतर महात्मा फुले विद्यापीठ राहुरी येथे एम.एस.सी एग्री अभ्यासक्रम पूर्ण केला. असा एकंदरीत त्यांचा शैक्षणिक प्रवास सुरू असताना नंतर त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सुरू केला आणि त्यानंतर एम.पी.एस.सी च्या मुलाखतीसाठी पुण्याला जात असताना काकाजींच्या आयुष्यात एक अनपेक्षित घटना घडली तो दिवस होता २ ऑगस्ट १९९२. कात्रजच्या घाटात काकाजींच्या जीब गाडीचा अपघात झाला. गाडीतले दोघे मित्र जागीच गतप्राण झाले आणि थोरले बंधू आबासाहेब जखमी झाले. सुदैवाने काकाजी थोडक्यात बचावले पण पायाला गंभीर दुखापत झाली. पण अशा जीवावर बेतलेल्या संकटाला धीराने तोंड देत पायाला प्लास्टर असताना काकाजींनी त्यावेळेस स्ट्रेचरवरून मुलाखत दिली. अशाप्रकारे मुलाखत देण्याची एम.पी.एस. सी.च्या इतिहासातील ही पहिलीच घटना असावी पण या अपघाताने काकाजींना आत्मसाक्षात्कार घडला… गाडीमधले दोन जीव जागीच गतप्राण झाले पण परमेश्वर कृपेने आपण जिवंत राहिलो याच्यामागे माझ्याकडून काही चांगले कर्म करवून घेण्यासाठीच दैवाने मला हा पुनर्जन्म दिला आहे.मग असे असेल तर इथून पुढचे जीवन अवघ्या जीवांसाठी वाहून घ्यायचे. अशा आत्मचिंतनातून काकाजींच्या आध्यात्मिक व सत्कार्याची दिशा निश्चित झाली. पुढे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षेतून पहिल्यांदा गटविकास अधिकारी म्हणून शिरोळ या ठिकाणी रुजू झाले. या ठिकाणी वास्तव्यास असताना काकाजींचे नृसिंहवाडीला येणे जाणे व्हायचे त्यामुळे त्यांच्यातील अध्यात्मिक वृत्ती अधिक दृढ झाली.
दत्तगुरूंच्या ठायी असणारे आदरणीय कर्नल रघुनाथराव पाटील उर्फ स्वामी प्रणवानंद यांचे गुरुपद स्वीकारून त्यांचे शिष्यत्व पत्करले..तसेच मुरगुड येथील आदरणीय श्री कृष्ण देशमुख काकाजी यांना ते गुरुपदी मानतात. ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र कोल्हापूर, उपायुक्त जलस्वराज्य पुणे, पाणी पुरवठा, वसुंधरा प्रकल्पावर सहाय्यक मुख्य कार्यकारी अधिकारी व त्यानंतर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कोल्हापूर इथपर्यंत त्यांचा प्रशासकीय कार्यकिर्दीचा आलेख सर्वोत्तम राहिला.. प्रशासनातील स्वच्छ, प्रामाणिक व कर्तबगार अधिकारी व सर्वसामान्य जनतेसाठी त्यांच्या कार्यालयाचे दरवाजे उघडे होते अशी त्यांची कारकीर्द एकंदरीत लोकसेवेकरिता राहिली. नजीकच्या काळात ३१ जुलै २०१८ रोजी त्यांनी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कोल्हापूर येथून स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे.त्यामुळे पूर्णवेळ समाजसेवारुपी कार्याला त्यांनी अखंड वाहून घेतले आहे. अशा सेवाकार्याच्यामागे काकाजींच्या अर्धांगिनी व अवघ्यांच्या आईसाहेब सौ.प्रतिभाताई इंद्रजीत देशमुख यांची सदैव मोलाची साथ लाभत असते. तसेच काकाजींच्या संसाररूपी वेलीवर संस्काररुपी मुले कन्या यशोमतीदीदी एम.बी.बी.एस चे शिक्षण पूर्ण करून सध्या पी.जी. अभ्यास करत आहे व चिरंजीव प्रणवभैया बारावीचे शिक्षण पूर्ण करून पुढील पदवीधर शिक्षण घेत आहे अशाप्रकारे दरवळणाऱ्या सुगंधी फुलासारखे या मुलांचे जीवन बहरत आहे.
ज्ञानाची अखंड वाहणारी गंगा म्हणजे काकांजीची अमोघ ओघवती अमृतवाणी. वाचनाचा प्रचंड व्यासंग. काकाजींचे जवळजवळ ७००० पुस्तकांचे स्वतःचे सुसज्ज ग्रंथालय आहे. तसेच काकाजींची स्वतःची पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. आपल्या अमृतवाणीतून संतापासून मंहतापर्यंत आणि विचारवंतांपासून समाजसुधारकांच्या विचार संस्काराच्या ज्ञानामृताची संजीवनी अवघ्या जीवांना देत असतात. संतांच्या विचारांचा सार सांगताना शितल असणारी वाणी…छत्रपती शिवाजी महाराजांच्या, मावळ्यांच्या क्रांतीवीरांच्या पराक्रमाची गाथा सांगताना ही वाणी तितकीच प्रखर वीररसाने रोमारोमात अंगार फुलवते. ‘अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्हीं लोक’ माऊलींचा हा संस्कार लेवून काकांजी त्याच माऊलींच्या अंतःकरणाने सुखाचे हे बीज आपल्या मधूर वाणीने जनमाणसांच्या हृदयी रुजवत असतात. अशा मानवसेवेच्या उन्नत कार्यासाठी दिवसरात्र त्यांच्या रथाची चाके अखंड भिरभिरीत असतात. अखंड महाराष्ट्र काकाजींच्या वाणीवर भरभरून प्रेम करतो. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन विचारांचा, प्रबोधनाचा जागर ते मांडत असतात.आजही सोशल मीडियाच्या प्रभावशाली माध्यमातून काकाजींचे विचार सर्वदूर ऐकले जातात. काही मिनिटात जीवनाचा सार सांगणारी अर्थपूर्ण अंतर्मुख करायला लावणारी ही अमृतवाणी व्हाट्सएपच्या माध्यमातून मोबाईलवर ऐकायला मिळते. त्यातील मौलिक विचार मनाचे आरोग्य उत्तम राखून रोजच्या जगण्याला नवं बळ देतात. अशी काही उदाहरणे आहेत की,दुर्धर आजाराने ग्रासलेल्या रोगी बांधवानाही या अमृतवाणीने नकारात्मक विचारातून बाहेर काढून त्या आजाराशी लढून जगण्याची सकारात्मक प्रेरणा निर्माण केली आहे.कीर्तनकार, प्रवचनकार, नामवंत प्रेरणादायी व्याख्याते, विचारवंत, संत साहित्याचे गाढे अभ्यासक, लेखक, कवी अशी विविध रूपे काकाजींच्या व्यक्तीमत्वात सामावलेली आहेत. अशा बहुआयामी संगमाच्या उगमस्थानातून प्रसवरवणारी विचारवाणी ज्ञानप्रवाहित होऊन जनासागराला मिळत असते..

नव्या दमाच्या पिढीची ऊर्जा व प्रेरणास्रोत म्हणजे काकाजी.नव्या तरुणाईमध्ये काकाजींच्याविषयी प्रचंड आत्मीयता व लगावआहे. तमाम नवयुवकांना योग्य दिशा देऊन उज्वल, समृद्ध व सक्षमीकरणाचे काकाजींचे अभियान सतत सुरू असते. भारताचे भविष्य ज्या पिढीच्या हातात आहे.तो भारत स्वामी विवेकानंदांच्या आदर्शवादी विचारांचा बलशाली भारत झाला पाहिजे.या विचारमंथनातून स्वामी विवेकानंदांच्या विचारांचा वसा व वारसा पुढे नेण्यासाठी आणि समाजसेवेच्या वृंधिंगत व्यापक विचारातून काकाजींच्या मार्गदर्शनाखाली १२ जानेवारी २००० साली शिवम अध्यात्मिक व सांस्कृतिक विकास प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेची स्थापना घारेवाडी येथे करण्यात आली.या शिवम प्रतिष्ठानच्या माध्यमातून काकांजीच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली लहान मुलांकरिता बालसंस्कार शिबीर,बलशाली भारताच्या स्वप्नपूर्तीच्या उद्देशाने घेतले जाणारे बलशाली युवा हृदय संमेलन जकर.. दुष्काळग्रस्त भागात मे महिन्यात माय भू सेवा यात्रेअंतर्गत श्रमदान शिबिर राबविले जाते,पालकांच्यासाठी पालकसंस्कार शिबीर, शिक्षकांसाठी गुरुजन हृदय संमेलन,महाराष्ट्रातील समाजसेवेला वाहून घेतलेल्या व्यक्ती व संस्था यांच्या भेटीचा अभ्यासपूर्ण दौरा म्हणजे सृजनयात्रा, शेतकऱ्यांसाठी शेतकरी हृदय संमेलन, महिलांच्यासाठी शौर्यवर्धिनी शिबिर. असे वर्षभरात सर्वांच्यासाठी सर्वसमावेशक विविध उपक्रम घेतले जातात. अलीकडे नव्याने वृद्धांसाठी सावली वृद्धाश्रम सुरू केले आहे. काकाजी आणि नाम फाउंडेशनचे नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे यांच्या सहयोगातून सध्या महाराष्ट्रात शेतकरी विषयक कार्याचा विस्तार होतोय.. नाम फाउंडेशन संस्था व शिवम प्रतिष्ठानच्या माध्यमातून शेतकरी जीवन हे सुखी, समृद्ध आणि संपन्न व्हावे कोणत्याही शेतकऱ्याला आत्महत्या करावी लागू नये यासाठीची एक चळवळ महाराष्ट्रात निर्माण होत आहे. अशाप्रकारे काकाजींच्या सामाजिक कार्याचा विस्तार महाराष्ट्रभर दिवसेंदिवस अधिकाधिक व्यापकदृष्ट्या वृंद्धीगत होतोय.
काकांजीबद्दल काय बोलावं आणि किती बोलावं…? आकाशासारखे विशाल आणि महासागरासारखे अथांग असे आमचे काकाजी. त्यांची महती शब्दांत मांडताना त्यांची व्याप्ती त्या शब्दांत मावणे कठीण आहे.
काकाजी म्हणजे अवघ्यांचे हृदय…अंतरीचे हृदयरुपी काकाजी म्हणजे जगण्यातला चेतनामयी जिवंतपणा…ज्ञानाचा निखळता…खळखळता… नितळ झरा…बुद्धीला शुद्धीची….मनाला मांगल्याची आणि जनाला सज्जनाची जोड देऊन कसं जगावं व कशासाठी जगावं या उद्दिष्टांप्रती आत्मप्रचिती घडवून आणणारी..अशी चैतन्याची, पावित्र्याची, मांगल्याची सर्वांगसुंदर सर्वगुणसंपन्न मूर्ती… ज्या मंगलमयी मुखातून साक्षात ज्ञानाची वदते सरस्वती असे आमुचे इंद्रजीत देशमुख (काकाजी) उर्फ स्वामी वासुदेवानंद सरस्वती. ज्या कुणाला ही सदमूर्ती भेटली..त्यांना जीवन कळले हो.. जीवनाचे सार्थक झाले हो.!!
जय हो….मंगल हो…!!

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव जिल्हा न्यायालयात बॉम्बच्या अफवेने खळबळ

Spread the love  बॉम्ब शोध पथकाची तपासणी ; सुरक्षा कडक बेळगाव : बेळगाव येथील जिल्हा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *