

बेळगाव : बेळगावच्या खडक गल्ली परिसरात झालेल्या दगडफेकीच्या घटनेतील खऱ्या दोषींवर कठोर कारवाई करून हिंदू-मुस्लीम सलोखा कायम राखला जावा, या मागणीसाठी खडक गल्लीतील नागरिकांनी आज शहर पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले.
आज बेळगाव शहर पोलीस आयुक्त कार्यालयापर्यंत मोर्चा काढत खडक गल्लीतील नागरिकांनी ही मागणी लावून धरली. दगडफेक करणाऱ्या मूळ आरोपींवर कारवाई करून दोन्ही समुदायांमधील सौहार्द कायम ठेवावे, असे निवेदन त्यांनी पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांना दिले. खडक गल्लीतील नागरिकांनी आपल्या मागणीचे अवलोकन करताना सांगितले की, “मोर्चा काढण्यास आमचा कोणताही विरोध नाही. मात्र, काही बाहेरील लोक आमच्या गल्लीत अचानक शिरले आणि त्यांनी चिथावणीखोर घोषणाबाजी केली. त्यामुळे गोंधळ निर्माण झाला. या परिसरात हिंदू आणि मुस्लीम बांधव नेहमीच सलोख्याने राहतात. त्यामुळे, गोंधळ निर्माण करणाऱ्या बाहेरील लोकांना सोडून पोलिसांनी दुसऱ्या कोणा निष्पाप व्यक्तींना ताब्यात घेऊ नये, तर खऱ्या दोषींवर कारवाई करावी. ” खडक गल्लीतील रहिवाशांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली.
“हिंदू-मुस्लीम सगळे एक आहोत, पण बाहेरून आलेल्या तिसऱ्या व्यक्तींमुळे हा गोंधळ निर्माण झाला आहे. चुकीच्या मार्गाने मोर्चा आणणारे तेच, दगडफेक करणारेही तेच, पण दुसऱ्या कोणावर तरी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हे गुन्हे तातडीने रद्द करावेत. यावर पोलीस विभागाने योग्य ती कारवाई करून परिसरात शांतता प्रस्थापित करावी.” यावर शहर पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. अवलोकन करताना त्यांनी सांगितले की, “कोणत्याही निष्पाप व्यक्तीवर कारवाई करण्यात आलेली नाही. उपलब्ध पुराव्यांच्या आधारेच कार्यवाही केली जात आहे. सामाजिक माध्यमांमधील अफवांवर विश्वास ठेवू नका. पोलीस विभागावर विश्वास ठेवून सहकार्य करा. पोलीस विभाग आपली कार्यशैली अधिक प्रभावी करेल.” यावेळी खडक गल्लीतील महिला आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta