

बेळगाव : 2016 साली एक नोव्हेंबर काळा दिनाच्या पार्श्वभूमीवर समाज माध्यमांवर महाराष्ट्राच्या समर्थनार्थ संदेश प्रसारित केल्याचा आरोप समिती कार्यकर्ते केदार करडी, मारुती पाटील व दत्ता येळ्ळूरकर यांच्याविरुद्ध बेळगाव येथील जेएमएफसी तिसऱ्या न्यायालयात गुन्हा दाखल करण्यात आला होता. न्यायालयीन प्रक्रियेनंतर गुन्हा सिद्ध न झाल्याने तब्बल नऊ वर्षानंतर त्या तिघांची निर्दोष मुक्तता करण्यात आली असून जप्त करण्यात आलेले मोबाईल परत देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
1 नोव्हेंबर 2016 रोजी “संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे,” “रहेंगे तो महाराष्ट्र मे नही तो जेल मे” अशा आशयाचा संदेश प्रसार माध्यमांवर प्रसारित करून मराठी भाषिकांना एक नोव्हेंबर काळा दिन गांभीर्याने पाळण्याचे आवाहन करण्यात आले होते. यामुळे समाजात भाषिक तेढ निर्माण झाल्याचा आरोप करत खडेबाजार पोलीस स्थानकाचे तत्कालीन निरीक्षक सातेनहळी यांनी स्वतः फिर्याद दाखल केली होती परंतु न्यायालयीन प्रक्रियेत गुन्हा सिद्ध न झाल्यामुळे न्यायालयाने तिघांनाही निर्दोष मुक्त केले आहे. या प्रकरणी ॲड. महेश बिर्जे, ॲड. प्रताप यादव, ॲड. बाळासाहेब कागणकर, ॲड. रिचमॅन रीकी, ॲड. वैभव कुट्रे, ॲड. प्रज्वल अथणी, ॲड. स्वप्निल नाईक यांनी बचाव पक्षाची बाजू न्यायालयात मांडली. न्यायालयाच्या या निर्णयाने सीमाभागात आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण पसरले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta