

बेळगाव : बेळगावमध्ये काँग्रेसच्या वतीने ‘मत चोरी’ प्रकरणी सही संकलन अभियानाचा आज एआयसीसी सचिव गोपीनाथ पळणियप्पन आणि उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आसीफ सेठ यांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला.
यावेळी बोलताना एआयसीसी सचिव गोपीनाथ पळणियप्पन म्हणाले की, “बॅलेट पेपरचा वापर करून निवडणुका घेतल्यास भाजपला ५० टक्केही जागा जिंकता येणार नाहीत.”“मत चोरीमुळेच भाजप प्रत्येक निवडणुकीत विजय मिळवत आहे. ईव्हीएममध्ये गोंधळ असल्याचा आरोप राहुल गांधी यांनीही केला आहे. अल्पसंख्याकांच्या मतांचा गैरवापर होत आहे. निवडणूक आयोगाचे अधिकारीही भाजपला पाठिंबा देत आहेत,” अशी टीका त्यांनी केली. “सही संकलन अभियानाच्या माध्यमातून आम्ही हा विषय सामान्य जनतेपर्यंत घेऊन जात आहोत. लोकही सह्या करून आपला पाठिंबा देत आहेत. ५ कोटी लोकांच्या सह्या जमा करून आम्ही राष्ट्रपतींना निवेदन सादर करू,” असे आश्वासन त्यांनी दिले.

बंगळुरूमध्ये महानगरपालिकेची निवडणूक बॅलेट पेपरवर घेण्यात आली होती. त्याचप्रमाणे, राज्यातील उर्वरित निवडणुकाही बॅलेट पेपरद्वारेच घेण्यात याव्यात, अशी मागणी त्यांनी केली. “जर बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यात आल्या, तर भाजप ५० टक्केही जागा जिंकू शकणार नाही,” असे ते ठामपणे म्हणाले.
दरम्यान, उत्तर मतदारसंघाचे आमदार आसीफ सेठ यांनी सांगितले की, “मत चोरीविरोधात संपूर्ण देशभरात सही संकलन अभियान राबवले जात आहे. मत चोरीचा फायदा भाजपला होत आहे. आम्ही यासंदर्भात राष्ट्रपतींना निवेदन देऊन लोकशाही वाचवण्याची मागणी करू,” अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
यावेळी काँग्रेस पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta