

खानापूर : खानापूर तालुक्याच्या माजी आमदार तथा एआयसीसी सचिव डॉक्टर अंजलीताई निंबाळकर यांच्या हस्ते हब्बनहट्टी येथे वाल्मिकी मंदिराचे उद्घाटन मोठ्या थाटात संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व्यंकू नाईक तर स्वागताध्यक्ष नागोजी पाटील हे होते. जांबोटी भागातील हब्बनहट्टी येथे हे एकमेव वाल्मिकी मंदिर उभारण्यात आले आहे. कार्यक्रमाची सुरुवात माजी आमदार अंजलीताई निंबाळकर, लक्ष्मण झांजरे, दीपक कवठणकर, प्रदीप कवठणकर, सुरेश कांबळे, लक्ष्मण घाडी यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाली.
यावेळी बोलताना डॉ. अंजलीताई निंबाळकर म्हणाल्या की, चाळीस वर्षांपूर्वी ग्रामस्थांनी वाल्मिकी मंदिर बांधण्याचा संकल्प केला होता. आज ग्रामस्थांचा हा संकल्प पूर्ण झाल्याचे समाधान आहे. मी माझ्या आमदारकीच्या काळात तालुक्यातील अनेक मंदिरांना सरकारी तसेच वैयक्तिक निधी उपलब्ध करून दिला आहे. वाल्मिकी मंदिरासाठी देखील मी निधी मंजूर केला होता तसेच गावातील श्रीकृष्ण मंदिर बांधणीसाठी देखील मी वैयक्तिक निधीतून फरशी बसून दिली होती.

त्या पुढे बोलताना म्हणाल्या की, मी सर्वांसमोर प्रभू श्री रामचंद्रांच्या साक्षीने सांगू इच्छिते की खानापूर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार साहेब जेव्हा जेव्हा तुम्हाला माझी गरज भासेल तेव्हा तेव्हा मी तुमच्यासोबत उभी असेल. त्याबद्दल कोणीही कोणतीही शंका बाळगण्याचे कारण नाही. यावेळी पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, या तालुक्यातील जनतेचे मी मनापासून आभार मानते. तालुक्यातील जनतेमुळेच माझे नाव पक्ष व संघटनेत देशभरात गाजत आहे. गोवा, दिवदमण किंवा उत्तराखंड, केरळ, तामिळनाडू असो मी देशभर पक्ष संघटनेसाठी फिरत आहे त्यामुळे मी तालुक्यातील जनतेची सदैव ऋणी राहील असे देखील म्हणाल्या.
हब्बनहट्टी गावातील मंदिरांसाठी ताईंनी आपल्या आमदारकीच्या काळात वेळोवेळी निधी उपलब्ध करून दिला आहे. वाल्मिकी मंदिरासाठी आमदार असताना बारा लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. तसेच सीसी रोड साठी पाच लाख व चार लाख असा निधी देखील त्यांच्या कार्यकाळात मंजूर केला होता. असे सूत्रसंचालन करीत असताना सांगण्यात आले.
Belgaum Varta Belgaum Varta