

बेळगाव : पती-पत्नीमध्ये झालेल्या भांडणातून पत्नीने पतीच्या अंगावर चक्क उकळते तेल ओतले. सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास मच्छे येथे ही घटना घडली. यामध्ये पती 40 टक्के भाजला असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
सुभाष हणमंतगौडा पाटील (वय 52, रा. रामनगर, मच्छे) असे जखमीचे नाव आहे. याप्रकरणी पत्नी वैशाली सुभाष पाटील (वय 40, रा. रामनगर, मच्छे) हिच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करून पत्नीला मंगळवारी (दि. 7) बेळगाव ग्रामीण पोलिसांनी अटक केली.
याबाबत बेळगाव ग्रामीण पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, उपरोक्त दांपत्यामध्ये गेल्या दोन वर्षांपासून भांडण आहे. दोन दिवसांपूर्वीही त्यांच्यामध्ये भांडण झाल्याने ते दोघे एकमेकांशी बोलत नव्हते. सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास पुन्हा दोघांमध्ये भांडण सुरु झाले. यावेळी पती हॉलमध्ये होता तर पत्नीकडून गॅसवर तळणे सुरु होते. यावेळी पुन्हा दोघांमध्ये वाद सुरु झाला. यावेळी रागाच्या भरात पत्नीने गॅसवरील कढई उचलून थेट पतीच्या अंगावर फेकली.
तेल उकळलेले असल्याने यामध्ये पती गंभीर जखमी झाला. त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी ते 40 टक्के भाजल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिस उपनिरीक्षक लक्काप्पा जोडट्टी तपास करत आहेत.
या प्रकरणी पत्नीवर खुनी हल्ल्याचा गुन्हा दाखल केला होता. मंगळवारी तिला अटक केल्याची माहिती पोलिस आयुक्त भूषण बोरसे यांनी माध्यमांना दिली.
Belgaum Varta Belgaum Varta