

बेळगाव : राज्य मराठी भाषा विकास संस्था मुंबई व बृहन्महाराष्ट्र मंडळ नवी दिल्ली यांच्या वतीने अभिजात मराठी सप्ताह या माध्यमातून आज बुधवार दिनांक ८ रोजी सायंकाळी वरेरकर नाट्य संघ सभागृहात ‘अभिजात काव्य सुमने’ हा बेळगावातील कवी-कवयित्री यांच्या स्वरचित व बेळगावातील सुप्रसिद्ध कवींच्या कवितांचे वाचन व भावार्थ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये बेळगावातील सहा कवी व कवयित्रीनी सहभाग दर्शविला. सौ.स्वाती कुलकर्णी, अक्षता पिळणकर, अस्मिता अळतेकर, हर्षदा सुंठणकर, किशोर काकडे, चिन्मय शेंडे यांनी भावार्थासह सादरीकरण केले.
या कार्यक्रमात सर्वांचे स्वागत व सूत्रसंचालन संस्थेच्या उपाध्यक्षा नीता कुलकर्णी यांनी आपल्या खुमासदार शैलीत केले. प्रास्ताविक अध्यक्ष प्रा.अनिल चौधरी यांनी केले.
राज्य मराठी भाषा संवर्धन संस्था तसेच बृहन्महाराष्ट्र मंडळाचे यंदाचे शतकमहोत्सवी वर्ष या अनुषंगाने बेळगाव स्थित मराठी भाषा प्रेमी मंडळ यांचे कार्य व उद्देश हे सांगताना मराठी भाषा ही सुरवातीस संस्कृतच्या आधाराने पण काव्यात्मक स्वरूपात मांडली गेली.
यात परभाषेतील व परदेशातील शब्द मिसळू लागले.आपल्या संतांनी ओव्यातून यांची संपन्नता वाढवली. तर सावरकरांनी यातील पर्यायी शब्द शोधले यामुळे आपली भाषा अधिक श्रीमंत बनली. पण भाषेला अभिजात दर्जा मिळण्यास विलंब लागला,हा खेद त्यांनी व्यक्त केला.
सहभागी व्यक्तींना कार्याध्यक्ष श्री. नितीन कपिलेश्वरकर यांनी गुलाब पुष्प व भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. तर आभार प्रदर्शन सचिव श्री. कुमार पाटील यांनी केले.
Belgaum Varta Belgaum Varta