

बेळगाव : १ नोव्हेंबरला बेळगावमध्ये ‘काळा दिवस’ साजरा करण्याचा प्रयत्न झाल्यास गप्प बसू नका. तुम्ही तुरुंगात गेलात तरी चालेल, तुम्हाला सोडवून आणायला मी आहे. ‘काळ्या दिवसाचे’ समर्थन करणाऱ्यांना सोडू नका असे प्रक्षोभक वक्तव्य कर्नाटक रक्षण वेदिकेचे राज्याध्यक्ष टी. ए. नारायणगौडा यांनी केले आहे.
आज बेळगावच्या गांधी भवनात कर्नाटक रक्षण वेदिकेच्या वतीने ‘कन्नड दीक्षा’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भूमी आणि भाषेच्या संरक्षणासाठी ‘कन्नड दीक्षा’ देण्यात आली. यावेळी बोलताना हुक्केरी हिरेमठाचे चंद्रशेखर शिवाचार्य स्वामीजींनी भूमी आणि भाषेसाठी स्वतःला समर्पित केलेल्या टी.ए. नारायणगौडा यांच्या कार्याची प्रशंसा केली. ‘सर्वांनी प्रथम दीक्षा घेतली पाहिजे. ‘तुम्ही कोण?’ असे विचारल्यास, ‘मी सर्वप्रथम कन्नडिग आहे’ अशी भावना प्रत्येकात असायला हवी,’ असे त्यांनी सांगितले.
अथणी मोटजी मठाचे जगद्गुरू प्रभु चन्नबसव स्वामीजी म्हणाले, ‘इतर ठिकाणीही कन्नडचे कार्यक्रम होतात, पण भाषिक बंधुत्वाच्या दृष्टिकोनातून संवेदनशील असलेल्या बेळगावात होणारा हा कार्यक्रम खूप मोठा आहे. नारायणगौडांसाठी कन्नड हाच धर्म, जात आणि पंथ आहे. लग्नातले कंकण तीन दिवसांत तुटू शकते, पण कन्नड दीक्षेचे हे कंकण जीवनाला तेजस्वी बनवणारे श्री रक्षणाचे कंकण आहे,’ असे मत त्यांनी व्यक्त केले.
काँग्रेसचे युवा नेते राहुल जारकीहोळी म्हणाले, ‘हजारो वर्षांचा इतिहास असलेल्या कन्नड भाषा आणि भूमीच्या रक्षणासाठी बेळगावात ‘कन्नड दीक्षा’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. भूमी भाषा आणि पाण्याच्या रक्षणासाठी कर्नाटक रक्षण वेदिके निरंतर काम करत आहे. आजपासूनच बेळगावात राज्योत्सवचा उत्साह संचारला आहे. राणी चन्नम्मांच्या या भूमीत आपण सर्वजण भूमी आणि भाषेच्या रक्षणासाठी पुढे येऊया. मुलांना त्यांच्या मातृभाषेत शिक्षण देणे आवश्यक आहे,’ अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
यावेळी क.र.वे.चे राज्याध्यक्ष टी.ए. नारायणगौडा म्हणाले, ‘काँग्रेस आणि भाजप हे पक्ष राज्यातील जनतेच्या बाजूने उभे राहतील की नाही, हे माहीत नाही; पण क.र.वे. जनतेच्या बाजूने असेल, असा विश्वास कन्नडिगांना आहे. तरुणांमध्ये कन्नडची आग पेटवण्याच्या उद्देशाने बेळगावहून ‘कन्नड दीक्षा’ कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. निवडणुकीच्या वेळी राजकीय पक्ष आमचा पाठिंबा घेतात, पण याच लोकांनी माझ्यावर १६ खटले दाखल करून मला तुरुंगात पाठवले. १०० वेळा तुरुंगात टाकले तरी आमच्या रक्तवाहिन्यांमध्ये ‘कन्नड, कन्नड’च आहे. कन्नडच्या कार्यक्रमाला लोकप्रतिनिधी आले नाहीत तरी चालेल, पण त्रिमूर्तींचे स्वरूप असलेल्या मुनींनी येऊन आशीर्वाद दिला आहे. तेच खरे कन्नडचे निर्माते आहेत,’ असे त्यांनी सांगितले.
पुढे बोलताना ते म्हणाले, ‘१ नोव्हेंबर रोजी बेळगावात कोणी ‘काळा दिवस’ साजरा करण्याचा प्रयत्न केला, तर गप्प बसू नका. तुरुंगात गेलात तरी चालेल, त्याला सोडू नका. तुम्हाला सोडवून आणायला मी आहे. कोणालाही घाबरू नका. एम.ई.एस.च्या लोकांनी मराठी महाराष्ट्रात ठेवावी. कन्नडिग म्हणून इथे राहायचे असेल तर राहा. अन्यथा, आम्ही मोफत बस आणि ट्रेन देऊ. गाठोडे बांधा आणि निघून जा,’ असे आवाहन त्यांनी केले. ‘१ नोव्हेंबरला ‘काळ्या दिवसा’साठी परवानगी दिल्यास संपूर्ण बेळगाव त्या दिवशी रणभूमी बनेल,’ असा इशाराही त्यांनी दिला.
यावेळी क.र.वे.चे राज्य संघटक सुरेश गवण्णवर, जिल्हाध्यक्ष दीपक गुडगनट्टी यांच्यासह अन्य सदस्य उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta