बेळगाव : सलगरे जि.सांगली ते कर्नाटक हद्दी पर्यंतच्या रस्त्याची दुर्दशा झाली होती त्यामुळे सीमाभागातील अथणी तालुक्यातील गावातील सीमावासीयांना त्रास सहन करावा लागत होता त्या संदर्भात सांगलीचे मा.जिल्हाधिकारी साहेब याना हा रस्ता तातडीने दुरुस्ती करावा यासाठी मेलद्वारे निवेदन पाठवण्यात आले होते त्याची दखल घेऊन मा. जिल्हाधिकारी साहेब यांनी प्रथम सार्वजनिक बांधकाम खात्याला या रस्त्याचा अहवाल देण्यास सांगितले. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या उपविभाग अभियंत्यांनी त्या रस्त्याची पाहणी करून हा रस्ता सार्वजनिक बांधकाम खात्याकडे येत नाही असे जिल्हाधिकारी सांगली आणि युवा समितीला पत्राद्वारे कळविले आणि हा रस्ता जिल्हा परिषद कडे येत असून त्यांच्याकडे पूढील कार्यवाहीसाठी सदर खात्याकडे प्रस्ताव पाठविण्यात आला. त्यानुसार सदर पाठपुराव्याची दखल घेत जिल्हा परिषदेच्या वतीने आज सलगरे ते कर्नाटक हद्दीपर्यंत रस्त्याचे पहिल्या टप्याचे काम जिल्हा परिषद सदस्या सौ. जयश्री तानाजी पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून सुरू करण्यात आले. यावेळी सलगरे गावचे सरपंच, उपसरपंच, सदस्य व मान्यवर उपस्थित होते.
या रस्त्यामुळे सांगली मिरज वर अवलंबून असलेल्या संबरगी, जमगी, अरळीहट्टी, पांडेगाव, खोतवाडी, अजूर, शिवणुर, जकरट्टी, विष्णुवाडी, बोमनाळ, मदभावी येथील विद्यार्थी, शेतकरी आणि रुग्णांची गैरसोय दूर होणार आहे.
संबरगी येथील युवा समितीच्या कार्यकर्त्यांनी यासाठी युवा समिती बेळगाव, मा.जिल्हाधिकारी सांगली, जि. प. सदस्या सौ. जयश्री पाटील यांचे आभार मानले आहेत.