Sunday , September 8 2024
Breaking News

वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपले

Spread the love

बेळगाव : बेळगाव शहर परिसराला आज दुपारी विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह जवळपास अर्धा तास पावसाने झोडपल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. पाऊस व सोसाट्याचा वाऱ्यामुळे कांही ठिकाणी घरांच्या पडझडीच्या घटना घडल्या तर कांही रस्त्यांवर झाडे व झाडाच्या फांद्या कोसळून वाहतूक विस्कळीत होण्याचे प्रकार घडले.
बेळगाव शहर परिसरासह तालुक्याला आज शनिवारी दुपारी 3 ते 3.15 च्या सुमारास सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाने झोडपले. सुमारे अर्धा तास जोरदार हजेरी लावल्यानंतर ढगाळ वातावरणासह सायंकाळपर्यंत पावसाची हजेरी अधून मधून सुरूच होती. यामुळे विशेष करून बाजारपेठेतील जनजीवन विस्कळीत झाले. वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाल्यामुळे खरेदी आणि कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या नागरिकांची एकच धावपळ उडाली.
मुसळधार पावसामुळे शहरात स्मार्ट सिटीची विकास कामे सुरू असलेल्या ठिकाणी चिखलाची दलदल निर्माण झाली. त्यामुळे अर्धवट विकास कामे झालेल्या रस्त्याच्या ठिकाणी ये -जा करताना नागरिक आणि वाहनचालकांना कसरत करावी लागत होती. जोराच्या पावसामुळे शहरातील सखल भाग आणि रस्त्यावर ठिकठिकाणी पाण्याची तळी साचली. बऱ्याच ठिकाणी गटारी तुंबून पाणी रस्त्यावरून वहात होते.


वादळी वाऱ्यामुळे वडगाव -येळ्ळूर रस्त्यासह शहर व तालुक्यातील कांही ठिकाणी रस्त्यावर झाडे व झाडाच्या फांद्या कोसळण्याच्या घटना घडल्या. वडगाव -येळ्ळूर मार्गावर झाड कोसळल्यामुळे येथील वाहतूक कांही काळ ठप्प झाली होती. तथापि ये-जा करणाऱ्या नागरिकांनीच झाड व फांद्या बाजूला काढून रस्ता वाहतुकीसाठी खुला केला. या रस्त्यावरील बीजे चा एक खांब देखील कोसळला.
झाडे -झाडाच्या फांद्या कोसळण्याबरोबरच कांही ठिकाणी घरांच्या पडझडीच्या घटना देखील घडल्या. वादळी वाऱ्यामुळे येळ्ळूरवाडी, येळ्ळूर येथील सरकारी कन्नड माध्यमिक शाळेच्या इमारतीचे पत्र्याचे मोठे शेड उडून खाली कोसळले.आज शनिवार अर्धा दिवस शाळा असल्यामुळे सुदैवाने त्यावेळी इमारतीखाली कोणी नव्हते अन्यथा अनर्थ घडण्याची शक्यता होती. शहरातील महात्मा फुले रोड येथील जुन्या मारुती मंदिरासमोरील विजेचा खांब तसेच या रस्त्यावरील एक झाड कोसळल्याची घटना घडली.
गोडसेवाडी येथे पावसामुळे घर कोसळले!
बेळगाव : आज दुपारी जोरदार वाऱ्यासह पाऊस झाला. यावेळी मंडोळी रोड गोडसेवाडी येथील
रविंद्र लक्ष्मण आवडनकर यांचे घर कोसळून नुकसान झाले.

About Belgaum Varta

Check Also

ईद-ए-मिलाद २२ सप्टेंबर रोजी साजरा करणार; मुस्लिम बांधवांचा निर्णय

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव काळातच होणार असलेला ईद-ए-मिलाद हा सण पुढे ढकलण्याचा निर्णय …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *