Wednesday , March 4 2026
Breaking News

खासगी ‘जय किसान’ मार्केटमधील सर्व व्यापाऱ्यांना आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून द्या : खा. जगदीश शेट्टर

Spread the love

 

बेळगाव : न्यायालयाचा अंतिम आदेश येईपर्यंत पुढील तीन महिन्यांसाठी खासगी ‘जय किसान’ मार्केटमधील सर्व व्यापाऱ्यांना आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे स्पष्ट निर्देश खासदार जगदीश शेट्टर यांनी बेळगाव ए.पी.एम.सी.च्या सचिवांना दिले.
परवाना रद्द झालेल्या ‘जय किसान’ भाजी मार्केटमधील व्यापाऱ्यांसाठी बेळगाव ए.पी.एम.सी.मध्ये उपलब्ध करून देण्यात येत असलेल्या जागा, सुविधा आणि बाजारातील रिकाम्या गाळ्यांची उपलब्धता याची माहिती खासदार शेट्टर यांनी आज प्रत्यक्ष भेट देऊन घेतली. त्यानंतर, ए.पी.एम.सी.च्या सभागृहात त्यांनी खासगी ‘जय किसान’ मार्केटचे व्यापारी आणि ए.पी.एम.सी.च्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली.

यावेळी खासगी ‘जय किसान’ मार्केटच्या व्यापाऱ्यांनी आपली समस्या मांडताना, व्यापार परवानाधारक व्यापाऱ्याला लोकशाहीमध्ये कोठेही व्यवसाय करण्याची मुभा आहे. कँटोन्मेंट भाजी बाजार बंद झाल्यानंतर ए.पी.एम.सी.ने ३ वर्षे ८ महिने व्यापाऱ्यांना गेटबाहेर ठेवले. आता आम्ही स्वतःचा खासगी भाजी बाजार सुरू केला तरी त्यालाही संधी दिली जात नाहीये. आमच्यावर अन्याय होत आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

अन्य एका खासगी मार्केटच्या व्यापाऱ्याने सांगितले की, आम्हाला गाळे देण्याचे आश्वासन देऊन खासगी मार्केटमधील व्यापाऱ्यांना बोलावण्यात आले आहे. मात्र, इथे केवळ २४ गाळे रिक्त आहेत आणि आम्ही २०० हून अधिक व्यापारी आहोत. त्यामुळे निविदा प्रक्रियेत गाळे मिळणे शक्य नाही. बेसमेंटमध्येही गाळे उपलब्ध आहेत. या समस्यांचे निराकरण करावे, अशी मागणी त्यांनी केली.

ए.पी.एम.सी.चे सचिव विश्वनाथ रेड्डी यांनी यावेळी माहिती दिली की, जिल्हा प्रशासनाने यापूर्वी अनेकवेळा व्यापाऱ्यांशी चर्चा केली आहे. रविवारी भरणारा शेतकरी आठवडा बाजार आणि रिकाम्या गाळ्यांमध्ये व्यापाऱ्यांना जागा दिली जात आहे. इथे कोणत्याही कमिशन एजंटला स्थान नाही. येत्या काळात गाळ्यांसाठी निविदा काढण्यात येणार असून खासगी मार्केटमधील व्यापाऱ्यांसाठीही यात सहभागी होण्याची संधी देण्यात आली आहे, असे त्यांनी म्हटले. यावर खासदार जगदीश शेट्टर यांनी, पुढील तीन महिन्यांसाठी रविवारच्या शेतकरी आठवडा बाजारात व्यापाऱ्यांना सोयीस्कर होईल अशी व्यवस्था करावी. न्यायालयाचा आदेश आल्यानंतर पुढील कारवाई करावी. व्यापाऱ्यांचे कोणत्याही प्रकारे नुकसान होणार नाही, याची काळजी घ्यावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.

यावेळी माजी उपमहापौर आणि विद्यमान नगरसेविका रेश्मा पाटील, भाजप नेते मुरुगेंद्रगौडा पाटील यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव जिल्हा न्यायालयात बॉम्बच्या अफवेने खळबळ

Spread the love  बॉम्ब शोध पथकाची तपासणी ; सुरक्षा कडक बेळगाव : बेळगाव येथील जिल्हा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *