

बेळगाव : बेळगाव येथील कर्नाटक लिंगायत एज्युकेशन संस्थेच्या लिंगराज महाविद्यालयाच्या समाजशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी हिंडलगा मध्यवर्ती कारागृहाला भेट दिली. या भेटीचा उद्देश विद्यार्थ्यांना कारागृहातील सुधारणा प्रक्रिया व समाजातील पुनर्वसन उपक्रमांविषयी माहिती करून देणे हा होता. त्यांनी तेथील प्रशासकीय व्यवस्थेबद्दल आणि कैद्यांच्या विविध प्रकारच्या कामाच्या उपक्रमांबद्दल माहिती गोळा केली. मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक श्री. व्ही. कृष्णमूर्ती यांनी तुरुंगाच्या प्रशासकीय व्यवस्थेबद्दल माहिती दिली आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली.
या भेटी दरम्यान कारागृहाचे अधीक्षक श्री. व्ही. कृष्णमूर्ती यांनी विद्यार्थ्यांना कारागृहातील विविध विभाग, कैद्यांसाठी असलेल्या शिक्षण, उद्योग आणि प्रशिक्षण योजनांविषयी सविस्तर माहिती दिली. त्यांनी सांगितले की कैद्यांचे पुनर्वसन आणि समाजात पुन्हा एकत्रीकरण यासाठी शासन प्रयत्नशील आहे.
विद्यार्थांनी कारागृहातील कार्यशाळा, ग्रंथालय, आणि ध्यानभवन यांचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी मिळाली. तसेच कैद्यांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन पाहिले. या अनुभवातून विद्यार्थ्यांमध्ये समाजाबद्दल सहानुभूती, जबाबदारी आणि सुधारात्मक दृष्टिकोन विकसित झाला.
विभागप्रमुख श्री. नवीन कनबरगी आणि प्रा. सुष्मिता पुजार यांच्या मार्गदर्शनांतर्गत समाजशास्त्र विभागाच्या एकूण ८० विद्यार्थ्यांनी भेट दिली.
Belgaum Varta Belgaum Varta