

बेळगाव : काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमा भाग अध्यक्ष शुभम शेळके यांना प्रक्षोभक वक्तव्य केल्याचा आरोप ठेवत माळ मारुती पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. त्यावेळी पोलिसांनी शुभम शेळके यांचा मोबाईल आणि कार जप्त केली होती. जप्त केलेला मोबाईल आणि कार परत आणण्यासाठी शुभम शेळके आज माळ मारुती पोलीस स्थानकात गेले असता पोलिसांनी त्यांचा मोबाईल आणि गाडी त्यांना परत देण्याऐवजी शेळके यांना जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले व तेथे वैद्यकीय चाचण्या करून त्यांना कोर्टात आणले व मागील कोणत्यातरी गुन्ह्यांमध्ये अटक करण्याचा प्रयत्न बेळगाव पोलीस प्रशासनाने आज केला. सदर प्रकरणाची माहिती ॲड. महेश बिर्जे यांना मिळताच कायदेशीर कारवाई पूर्ण करत शुभम शेळके यांचा तात्काळ जामीन मंजूर करून घेतला. उद्या रविवार त्याचप्रमाणे दिवाळीच्या सणानिमित्त न्यायालय बंद असल्यामुळे शुभम शेळके यांना जामीन मिळू नये व त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करावी या हेतूने बेळगाव पोलिसांनी केवळ सूडबुद्धीने मराठी भाषिक शुभम शेळकेंवर ही कारवाई केली. प्रशासनाच्या या कृतीमुळे बेळगावात मराठी माणसाचे खच्चीकरण करीत असल्याचे दिसून येत आहे. बेळगाव जिल्हा पोलीस प्रशासनाच्या या कृतीमुळे मराठी माणसात संतापाची लाट उसळली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta