

बेळगाव : अत्यंत चुरशीने झालेल्या बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर जारकीहोळी-जोल्ले गटाने अखेर आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. काल रविवारी सात जागांसाठी मतदान झाले असून यामध्ये अथणीमधून आमदार लक्ष्मण सवदी, रायबागमधून मावळते अध्यक्ष आप्पासाहेब कुलगुडे आणि रामदुर्गमधून मल्लाप्पा यादवाड यांनी विजय संपादित केला.
पण, चर्चेचा विषय बनलेल्या हुक्केरी, निपाणी, कित्तूर आणि बैलहोंगल मतदारसंघातील निकाल उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे राखून ठेवण्यात आला.
बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदावरून माजी खासदार रमेश कत्ती यांनी राजीनामा दिल्यापासूनच जोरदार राजकारण सुरू झाले होते. निवडणूक संपण्याआधीच तीन महिन्यांपासून अरभावीचे आमदार भालचंद्र जारकीहोळी यांच्या नेतृत्वाखाली जारकीहोळी आणि माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले यांचा गट सक्रिय झाला होता. तर दुसरीकडे नाराज माजी खासदार रमेश कत्ती आणि आमदार लक्ष्मण सवदी यांनीही आपला वेगळा गट कामाला लावला होता. त्यामुळे जिल्ह्याचे संपूर्ण राजकारण ढवळून निघाले होते. अखेर या निवडणुकीत जारकीहोळी-जोल्ले गटाला अपेक्षित यश दृष्टीक्षेपात असल्यामुळे वर्चस्व राखण्यात यश आले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta