

कुद्रेमानी ( प्रतिनिधी ) : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे कर्नाटक राज्याध्यक्ष, पत्रकार, उपक्रमशील शिक्षक आणि सीमाकवी म्हणून ओळखले जाणारे रवींद्र मारूती पाटील यांचा नुकताच पुणे आणि मिरज येथील साहित्य संमेलनात ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ देऊन सन्मान करण्यात आला. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याचा गौरव करण्यासाठी कुद्रेमानी ग्रामस्थांच्या वतीने ग्रामपंचायतीच्या अध्यक्ष विनायक नारायण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली दिमाखदार सत्कार सोहळा उत्साहात पार पडला.
या प्रसंगी प्रमुख वक्ते व चंदगड तालुका मराठी अध्यापक संघाचे मार्गदर्शक संजय साबळे यांनी म्हटले की, “सीमाकवी रविंद्र पाटील हे सीमाभागातील बहुआयामी रत्न आहेत. त्यांचा ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ हा आमचा अभिमान आणि स्वाभिमान आहे.”
कार्यक्रमात सीमाकवी रवींद्र पाटील, सौ. रोहिणी पाटील व मातोश्री आनंदी पाटील यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. सत्कारानंतर कृतज्ञतेचा भाव व्यक्त करताना पाटील म्हणाले, “हा सन्मान गावाचा आहे. गावाचा मान वाढविण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहीन.”
यावेळी ग्राम पंचायत अध्यक्ष विनायक पाटील , माणिक गोवेकर, वैजनाथ राजगोळकर व शंकर पाटील यांनी शुभेच्छा दिल्या.
सत्कार प्रसंगी ग्रामपंचायत, हनुमान भजनी मंडळ, शिवबा संघ, लक्ष्मी दूध संस्था, विकास सेवा सोसायटी, इंदिरा महिला सोसायटी व आंबेकर युवक मंडळ आदी विविध संस्था व संघटनांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.
कार्यक्रमाला दिपक पाटील, अरुण देवण, सुरेश पाटील, वैजनाथ राजगोळकर, बाळाराम कदम, शिवाजी गुरव, मधू पन्हाळकर, शंकर पाटील, रामलिंग पाटील, नाना पाटील, जोतिबा बडसकर, धोंडिबा पाटील, संजय पाटील, शशिकांत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक गोपाळ चौगुले यांनी केले, तर सुत्रसंचालन परशराम काकतकर यांनी उत्साही शब्दांत केले.
Belgaum Varta Belgaum Varta