

बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती बेळगाव यांची व्यापक बैठक युवा समिती कार्यालय कावळे संकुल येथे अध्यक्ष अंकुश केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी १ नोव्हेंबर काळ्या दिनाच्या मूक सायकल फेरीत मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने सामील व्हावे, असे आवाहन करण्यात आले.
भाषावार प्रांतरचनेत मराठी बहुल प्रदेश तत्कालीन केंद्र सरकारने कन्नड भाषिक म्हैसूर राज्यात अन्यायाने डांबला. त्याचा निषेध नोंदवण्यासाठी १९५६ पासून १ नोव्हेंबर हा दिवस काळा दिवस म्हणून पाळण्यात येतो. अजूनही सीमाभागातील मराठी माणसाची महाराष्ट्र राज्यात सामील होण्याची इच्छा तसूभरही कमी झाली नाही हे दर्शविण्यात येते. यावर्षीच्या काळ्या दिनाच्या मूक सायकल फेरीत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने केले आहे तरी सर्व मराठी भाषिकांनी मूक सायकल फेरीत सहभागी होत मराठी भाषिकांची एकजूट दाखवावी, असे आवाहन युवा समिती अध्यक्ष अंकुश केसरकर यांनी केले.
यावेळी मराठी भाषिकांना डिवचणाऱ्या आणि सीमाप्रश्नावर गरळ ओकणाऱ्या खासदार जगदीश शेट्टर तसेच कन्नड संघटनाच्या म्होरक्यांचा निषेधाचा ठराव करण्यात आला.
उच्च न्यायालयात दाखल काळ्या दिना संदर्भातील याचिकेचा निकाल मराठी भाषिकांच्या बाजूने लागला त्यासाठी यशस्वी बाजू मांडणाऱ्या ॲड. महेश बिर्जे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्यात आला.
तसेच उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा मान राखत काळ्या दिनाच्या मूक सायकल फेरीला प्रशासनाने आडकाठी करू नये आणि संविधानाचे दिलेल्या अधिकारांवर गदा आणू नये असे कार्याध्यक्ष सचिन केळवेकर म्हणाले.
यावेळी उपाध्यक्ष वासू सामजी, गुंडू कदम पदाधिकारी सुरज कुडुचकर, खजिनदार विनायक कावळे, रोहन कुंडेकर, साईराज जाधव, महेश जाधव, आकाश भेकणे, सुरज चव्हाण, विकास भेकणे, प्रवीण धामनेकर, सौरभ तोंडले, अश्वजीत चौधरी उपस्थित होते. सरचिटणीस श्रीकांत कदम यांनी प्रास्ताविक मांडले तर चिटणीस प्रतीक पाटील यांनी आभार प्रदर्शन केले.
Belgaum Varta Belgaum Varta