
बेळगाव : कर्नाटक – महाराष्ट्र सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयातील दावा क्रमांक ४/२००४ प्रकरणात २७ ऑक्टोबर २०२५ रोजी झालेल्या सुनावणी मूळ दाव्याची पुढील सुनावणी २१ जानेवारी २०२६ रोजी होणार असून या पार्श्वभूमीवर न्यायालयासाठी पूर्वतयारी करणे गरजेचे आहे यासाठी उच्च अधिकार समितीची तात्काळ बैठक बोलवावी, अशी मागणी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे. त्याची प्रत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच अप्पर मुख्य सचिव सामान्य विभाग यांना पाठविण्यात आली आहे. २१ जानेवारी २०२६ पासून होणाऱ्या सलग सुनावणीपूर्वी सीमाप्रश्नी कायदेशीर रणनीती आखणे, साक्षीदारांची शपथपत्रे त्याबरोबर पुरावे यांची पूर्वतयारी आणि वरिष्ठ वकिलांच्या सल्लामसलती करण्यासाठी सीमा प्रश्न तज्ञ समितीची तात्काळ बैठक होणे गरजेचे असल्याचे समितीने पत्रात नमूद केले आहे. २०१४ नंतर सीमा प्रश्नाचे न्यायालयीन लढ्याला पुन्हा एकदा गती मिळालेली आहे. लढा सध्या निर्णायक टप्प्यावर आलेला आहे. अशावेळी महाराष्ट्र शासनाची तयारी कशा पद्धतीने आहे याकडे सीमा भागातील मराठी भाषिकांचे लक्ष लागून राहिले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta