
बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महिला आघाडीने येत्या १ नोव्हेंबर रोजी पाळल्या जाणाऱ्या ‘काळा दिना’संदर्भात नुकतीच एक बैठक आयोजित केली होती.
सन १९५६ मध्ये तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आकाशवाणीवरून कर्नाटक राज्याच्या स्थापनेची घोषणा केली आणि हा न्याय्य सीमाभाग कर्नाटकात जबरदस्तीने डांबण्यात आला. तेव्हापासून आजपर्यंत सीमाभागातील २५ लाखांहून अधिक मराठी भाषिक केंद्र सरकारच्या विरोधात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली मूक सायकल फेरी काढून आपला निषेध नोंदवत आले आहेत. “यावर्षी येत्या शनिवारी, १ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मूक सायकल फेरीत आपण सर्व महिलांनी अधिकाधिक संख्येने उपस्थित राहून आपला निषेध नोंदवावा,” असे आवाहन महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ. रेणू किल्लेकर यांनी केले.
तसेच, महिला आघाडीच्या सेक्रेटरी सौ. सरिता पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना महिलांना ‘काळ्या दिना’चे महत्त्व समजावून सांगितले. “महिलांनी काळी साडी परिधान करून किंवा काळी फीत बांधून आपला निषेध नोंदवावा,” असे आवाहन त्यांनी केले.
महिला आघाडीच्या उपाध्यक्षा सौ. सुधा काकडे यांनीही या बैठकीत आपले मनोगत व्यक्त केले. या बैठकीस सौ. भाग्यश्री जाधव, विजया कुडवी, अर्चना कावळे, प्रभावती सांबरेकर, कोमल पाटील, सविता काकतकर, माला जाधव, आशा पाटील, अरुणा शिंदे, राजसी बांबुळकर, शामिनी पाटील, विजया शानबाग, लक्ष्मी कुरणे, अनुपा पाटील, प्रथा पिंगुळे, सुनीता कंग्राळकर, इंदू घोरपडे, सुजाना बामुचे, कांचन अळकुंदकर यांच्यासह मोठ्या सांख्येने कार्यकर्त्या उपस्थित होत्या.
Belgaum Varta Belgaum Varta