
जिल्हा सत्र न्यायालयात वकील महेश बिर्जे यांनी दिले आव्हान
बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समिती सीमाभागचे अध्यक्ष व युवा नेते श्री. शुभम शेळके यांना बेळगाव पोलीस प्रशासन येनकेन प्रकारे अडकवण्याचा डाव आखत आहे, यावेळी त्यांनी नवीन डाव आखला असून प्रतिबंधात्मक सूचनेचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवून माळमारुती पोलीस स्थानकाच्या शिफारशी वरून तब्बल पाच लाखाचा दंड ठोठावण्याचा आदेश बेळगाव कायदा व सुव्यवस्थाचे पोलीस उपायुक्त यांनी दिला आहे.
शुभम शेळके हे वारंवार पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे उल्लंघन करत असून त्यांचेवर बेळगाव शहराच्या विविध पोलिस स्थानकात १९ गुन्हे दाखल असून ते दोन भाषिकांमध्ये तेढ निर्माण करत आहेत असा जावई शोधही या नोटीसीमध्ये एकतर्फी कारवाई करणाऱ्या पोलीस प्रशासनाने काढला आहे.
२६ मार्च २०२५ रोजी शुभम शेळके यांना प्रतिबंधात्मक नोटीस देऊन तुरुंगात पाठविले होते, मराठी भाषिक व महाराष्ट्र एकीकरण समितीच्या विरोधात बेळगावात येऊन वेदिकेचा म्होरक्या नारायणगौडा याने गरळ ओकली होती, त्याला प्रत्युत्तर म्हणून शुभम शेळके यांनी समाज माध्यमावर एक व्हिडिओ प्रसारित करून
गौडाचा खरपूस समाचार घेऊन निषेध नोंदवला होता, त्यावर माळमारुती पोलीस स्थानकात शेळके यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. दिनांक २७ ऑक्टोबर रोजी पोलीस आयुक्त कार्यालयात बोलावून पोलिसांनी दिलेल्या या तुघलकी नोटीसीला वकील महेश बिर्जे यांनी जिल्हा सत्र न्यायालयात आव्हान दिले आहे.
गेल्या दोन दीवसापूर्वीच मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर, सरचिटणीस मालोजी अष्टेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे यांना पाच लाखाची प्रतिबंधात्मक नोटीस पोलीस प्रशासनाने दिली आहे, तर शुभम शेळके यांना दंड ठोठावण्याची तुघलकी कारभार या प्रशासनाने केला आहे. मध्यवर्ती नेत्यांच्या नोटीसीलाही महेश बिर्जे यांनी जिल्हा सत्र न्यायालयात आव्हान दिले आहे.
गेली सत्तर वर्षे लोकशाही मार्गाने लढणाऱ्या मराठी भाषिकांना कर्नाटक सरकारने केलेला भाषिक अत्याचार व अन्याय हा काही नवीन नाही, पण आता नेत्यांना व मराठीसाठी कार्यरत राहणाऱ्या युवकांना आर्थिक भुर्दंडात अडकवण्याचा कुटील डाव आखला आहे.
या सर्व गोष्टींना महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वकिलांमार्फत योग्य ते उत्तर न्यायदेवतेच्या मंदिरातच देण्यात येणार असून आशा कोणत्याही दबावाला मराठी माणूस बळी पडणार नाही, आपला लढा लढायचा आणि जिंकायचाच, त्यासाठी येत्या १ नोव्हेंबरला काळ्यादिनी मराठी भाषिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन यावेळी शुभम शेळके यांनी केले.
यावेळी ऍड. बाळासाहेब कागणकार, ऍड. एम. बी. बोन्द्रे, ऍड.वैभव कुट्रे, ऍड.अश्वजित चौधरी, कार्याध्यक्ष धनंजय पाटील, सरचिटणीस मनोहर हुंदरे, यल्लाप्पा शिंदे, शांताराम होसुरकर आदी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta