
बेळगाव : 1 नोव्हेंबर 1956 साली भाषावार प्रांतरचना झाली आणि बेळगावसह संपूर्ण सीमाभाग अन्यायाने कर्नाटकात डांबण्यात आला. त्याच्या निषेधार्थ समस्त सीमावासीय 1 नोव्हेंबर हा “काळा दिन” म्हणून आचरणात आणतात. यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने विराट सायकल फेरी काढण्यात येते.


निषेध फेरीसाठी सकाळपासूनच महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते, महिला, आबालवृद्ध संभाजी उद्यानात जमू लागले आहे. काळ्या दिनी काळी वस्त्रे परिधान करून समितीच्या बॅनरसह “बेळगांव, कारवार, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे”च्या घोषणांनी आसमंत दुमदुमला होता. यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आले होते. यावेळी केंद्र सरकारचा निषेध नोंदविण्यासाठी बालचमू देखील काळे झेंडे दाखवत निषेध फेरीत सहभागी होत आपली महाराष्ट्रात जाण्याची इच्छा देखील व्यक्त केली.

सकाळी 9.30 वाजता महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली निषेध फेरीला सुरवात झाली. संभाजी उद्यानातून सकाळी साडेनऊ वाजता धर्मवीर संभाजी उद्यान येथून मुकफेरीला सुरुवात झाली. त्यानंतर यश हॉस्पिटल महाद्वार रोड, भातकांडे शाळा, कपिलेश्वर उड्डाण पुलावरून ताशीलदार गल्ली, भांदूर गल्ली, अंबा भवन रोड, शिवाजी रोड, हेमुकलानी चौक, कपिलेश्वर उड्डाण पुल, एसपीएम रोड, नार्वेकर गल्ली, आचार्य गल्ली, गाडे मार्ग, सराफ गल्ली, कचेरी गल्ली, मिरापूर गल्ली, महात्मा फुले रस्ता मार्गे गोवावेस सर्कलहून मराठा मंदिर येथे सांगता झाली.
मराठा मंदिर रेल्वे ओव्हरब्रीज येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेदरम्यान मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे खजिनदार प्रकाश मरगाळे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावर्षीच्या सायकल फेरीत कन्नड संघटनांच्या पोकळ धमक्या तसेच प्रशासनाच्या दबावाला बळी न पडता काळ्या दिनाच्या निषेध फेरीत युवकांनी आपला उत्स्फूर्त सहभाग दाखविला त्याबद्दल मराठी भाषिक युवकांचे अभिनंदन केले.

कार्याध्यक्ष मनोहर किणेकर यांनी सीमा प्रश्नाच्या पुढील वाटचालीवर भर दिला. सीमा प्रश्न प्रलंबित असलेल्या खटल्याची सुनावणी 21 जानेवारी 2026 रोजी सर्वोच्च न्यायालयात होणार आहे त्यानंतर सलग सुनावणी होणार आहे. कर्नाटकने दाखल केलेला 12 अ अर्ज निकाली लागल्यानंतर नियमित सुनावणी होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने सीमा समन्वय मंत्र्यांशी तसेच तज्ञ समितीची बैठक घेऊन योग्य तो पाठपुरावा करणे गरजेचे असल्याचे सांगितले. त्याचबरोबर बेळगाव महानगरपालिकेने नियमबाह्य केलेल्या कारवाईचा निषेध केला. महानगरपालिकेने भाषिक अल्पसंख्यांक आयोगाच्या कायद्याची पायमल्ली करत पुन्हा एकदा बेळगावत व्यवसायिक आस्थापनांवरील तसेच दुकानांवरील नामफलकांवर असलेल्या मराठी व इंग्रजी फलकांवर रंग फासण्याचा प्रकार केला आहे याबाबत बोलताना महानगरपालिकेने शहरातील रस्त्यांची डागडुजी करणे किंवा जनतेच्या मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष करून केवळ मराठी द्वेषापोटी फेरीची ही कारवाई करत असल्याचे सांगितले आणि भविष्यात देखील प्रशासनाच्या दडपशाहीला न जुगारता सीमा लढा असाच चालू राहणार असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी समितीचे नेते, कार्यकर्ते, महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
Belgaum Varta Belgaum Varta