
बेळगाव : धर्मांतराच्या गंभीर आरोपांवरून बेळगाव जिल्ह्यातील कंग्राळी बुद्रुक येथे संतप्त नागरिक आणि हिंदुत्ववादी संघटनांनी आज ग्रामपंचायतीला घेराव घातला. लोकांची दिशाभूल करून त्यांना धर्मांतरास प्रवृत्त करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थेवर तात्काळ कारवाई व्हावी, अशी मागणी केली.
कंग्राळी बुद्रुक येथे सुमारे पाच वर्षांपूर्वी एका विशिष्ट धर्माची स्वतःला धर्मगुरू म्हणवणारी व्यक्ती वास्तव्यास आली. पत्र्याचे शेड घालून राहणाऱ्या या व्यक्तीबद्दल संशय निर्माण झाल्याने गावकऱ्यांनी त्याला त्यावेळी ताकीद दिली होती. तथापि, त्यानंतर संबंधित व्यक्ती लोकांची दिशाभूल करून त्यांना धर्मांतर करण्यास प्रवृत्त करत असल्याचे गावकऱ्यांच्या निदर्शनास आले.दरम्यान, या व्यक्तीने गावात ‘येशू आधार केंद्र’ नावाची संस्था देखील स्थापन केली. ही संस्था सुरू करण्यासाठी आवश्यक कागदपत्री व्यवहार पूर्ण करण्यात ग्रामपंचायतीतील काही पदाधिकारी व सदस्यांनी सहकार्य केल्याचा आरोप गावकऱ्यांकडून केला जात आहे. अलीकडे या व्यक्तीचे धर्मांतराचे प्रयत्न वाढल्याने संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी आणि श्रीराम सेना हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने ग्रामपंचायत कार्यालयात धडक देऊन घेराव घातला.घेराव घालण्यापूर्वी गावकरी व कार्यकर्त्यांनी ग्रामपंचायत अध्यक्षांना आपली मागणी नमूद असलेले निवेदन सादर केले. ग्रामपंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष, पीडीओ, सचिव व सर्व सदस्यांना देण्यात आलेल्या या निवेदनात गावातील मरगाई नगर येथे चालू असलेल्या गैरप्रकारांवर तत्काळ निर्बंध घालावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदन स्वीकारून ग्रामपंचायत अध्यक्षा रोहिणी बुवा यांनी संबंधित प्रकरणासंदर्भातील निर्णय येत्या सोमवारी जाहीर केला जाईल, असे आश्वासन दिले.

आंदोलनानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना श्रीराम सेना हिंदुस्थानचे बेळगाव तालुका प्रमुख भरत पाटील म्हणाले की, “कंग्राळी बुद्रुक येथे धर्मांतराचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर आम्ही आज येथे ग्रामपंचायतीला जाब विचारण्यासाठी आलो. संबंधित व्यक्तीला ग्रामपंचायतीकडून घर बांधण्यासाठी परवाना तसेच त्याच्या संस्थेची अधिकृत नोंदणी देण्यात आली आहे. परंतु बेकायदेशीर धर्मांतराचा संशय असल्यास अशा व्यक्तींची शहानिशा करूनच परवानगी द्यायला हवी होती. त्यामुळे ग्रामपंचायतीने तात्काळ कारवाई करून संबंधित व्यक्तीचे परवाने रद्द करावेत.”याबाबत पुढील चार दिवसांत आवश्यक कारवाई करण्याचे आश्वासन ग्रामपंचायत अध्यक्षांनी दिल्याची माहितीही पाटील यांनी दिली. यावेळी विविध हिंदू संघटनाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta