
बेळगाव : ऊस दराच्या वाढत्या तणावामुळे राज्याचे साखरमंत्री शिवानंद पाटील यांनी आज, गुरुवारी, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या विशेष निर्देशानुसार हुबळीहून थेट बेळगावला धडक दिली. बेळगावात दाखल होताच, त्यांनी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन आणि साखर आयुक्तांना एका गोपनीय ठिकाणी बोलावून तात्काळ बैठक घेतली.
शेतकरी संघटनांकडून घेराव आणि प्रतिबंधाची शक्यता असल्याने मंत्र्यांचा हा दौरा अत्यंत गोपनीय ठेवण्यात आला होता. बैठकीदरम्यान मंत्र्यांनी थेट मुख्यमंत्र्यांशी दूरध्वनीवर गंभीर चर्चा केल्याचे समोर आले. बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना मंत्री पाटील म्हणाले, मुख्यमंत्री यांनी उद्या बेंगळुरू येथे सर्व साखर कारखानदारांची बैठक बोलावली आहे. त्या बैठकीत होणाऱ्या निर्णयांनुसार राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मदत करण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू. शेतकऱ्यांनी केलेल्या न्याय्य आंदोलनाला शक्ती देण्याचा आमचा प्रयत्न राहील. लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले आहेत. संघर्ष टाळून सामंजस्याने यावर तोडगा काढू, असे आश्वासन त्यांनी दिले.
यावेळी त्यांनी ‘एफआरपी’ (निश्चित करण्यावरून केंद्र सरकारकडे बोट दाखवले. ते म्हणाले, राज्यातील साखरमंत्र्यांना लक्ष्य केले जात आहे, पण ‘एफआरपी’ केंद्र सरकार ठरवते. देशाचे साखरमंत्री आपल्या राज्यातीलच आहेत; तरीही दुर्दैवाने आतापर्यंत त्यांचे नाव कोणी घेतले नाही असे सांगत त्यांनी प्रल्हाद जोशी यांच्यावर निशाणा साधला. शेतकऱ्यांचा प्रश्न लवकरात लवकर सोडवण्याचा आमचा कसून प्रयत्न सुरू आहे असे सांगत मंत्री शिवानंद पाटील जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांसह थेट आंदोलक शेतकरी उपस्थित असलेल्या गुर्लापूरकडे रवाना झाले.
Belgaum Varta Belgaum Varta