
बेळगाव : मच्छे येथे सकल मराठा समाजाच्या वतीने शिवप्रताप दिन साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून बेळगावचे महापौर मंगेश पवार तसेच सामाजिक कार्यकर्ते व माजी जिल्हा पंचायत सदस्य, शिक्षण व आरोग्य स्थायी कमिटी अध्यक्ष रमेश गोरल, तसेच निवृत्त जवान नंदू अनगोळकर, देवस्थान पंच कमिटी सदस्य नागेश गुंडोळकर, कृष्णा बिर्जे, प्रगतशील शेतकरी मारुती लाड, लेखक बजरंग धामणेकर उपस्थित होते.
प्रथम मच्छे हायस्कूलच्या विध्यार्थीनींनी स्वागत गीत व प्राथमिक शाळेच्या विदयार्थिनींनी इशस्तवन म्हटले. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व शिवमुर्तीचे पूजन करण्यात आले.
यावेळी उपस्थित मान्यवरांचा तसेच कुस्तीमध्ये प्रशस्ती मिळवलेला विध्यार्थी प्रज्वल पाटील व मॅरेथॉन मध्ये पहिला क्रमांक मिळवलेली विदयार्थीनी नकुशा मंगणाकर चा विशेष सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमावेळी बोलताना महापौर श्री. मंगेश पवार म्हणाले सर्व मराठा समाज एकत्र यावा, मराठी युवकांनी उद्योजकतेकडे तसेच विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास करून, स्पर्धा परीक्षांकडे वळावे. नवनवीन क्षेत्रे पदाक्रांत करावी. सर्वांनी आपल्या जीवनामध्ये शिवनीतीचा अवलंब करून प्रगती करावी. आयुष्यात येणारी अफजलखानासारखी भयानक विध्वंसक संकटे आली म्हणून माघार न घेता त्या संकटांचाही कोथळा बाहेर काढण्याची आपण क्षमता बाळगावी. शिवचरित्र समजून घेऊन शिव विचारांचे जीवनामध्ये आचरण करावे, असे विचार मांडले.
रमेश गोरल मराठी युवकांना मार्गदर्शन करताना म्हणाले. युवकांनी व्यसनापासून दूर राहावे. कोणत्याही व्यवसायाला कमी न लेखता स्वतःचे व्यवसाय निर्माण करावेत.
सामाजिक कार्यकर्ते संतोष जैनोजी यांनी आपल्या भाषणामध्ये शिवप्रताप दिनाचे महत्त्व सांगतेवेळी शिवप्रताप दिन शौर्याची व स्वराज्य स्थापनेची घोषणा होती. अफजलखानाचा वध म्हणजे छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या उत्कृष्ट युद्धनीती, गनिमी कावा व प्रशासकीय कुशल कार्याचा पुरावा आहे. अफजलखानाच्या वधामुळे आदिलशाही खिळखिळी झाली व मराठ्यांच्या विजयाला तसेच स्वराज्याला अधिष्ठान प्राप्त झाले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कान्सूली शाळेचे शिक्षक विनायक चौगुले यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वासुदेव लाड, गजानन छप्रे, अमोल लाड,संभाजी कणबरकर, सुशील धामणेकर, शिवाजी नावगेकर, परशराम बेळगांवकर, पुंडलिक कणबर्गी, केतन चौगुले, केदारी करडी व गावातील युवक तसेच नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.
सागर कणबरकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta