
बेळगाव : गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनी व मराठी विद्यानिकेतन बेळगाव शाळेच्या वतीने मानवतावादी लक्ष्मणराव ओऊळकर यांच्या स्मरणार्थ सीमा भागातील शिक्षक बांधवांसाठी महाराष्ट्रातील शिक्षण तज्ञ हेरंब कुलकर्णी यांचे ‘मुलांच्या विवेकी जडणघडणीत शिक्षकांचे योगदान’ या विषयावरचे व्याख्यान शुक्रवार दिनांक 14 नोव्हेंबर रोजी सायंकाळी चार वाजता गोगटे रंगमंदिर स्कूल ऑफ कल्चर या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे. साठे प्रबोधिनीच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले असून यावेळी साठे प्रबोधनीच्या वतीने घेण्यात आलेल्या मानवतावादी लक्ष्मणराव ओऊळकर विज्ञान कथाकथन स्पर्धांचा बक्षीस वितरण सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाला शिक्षण तज्ञ हेरंब कुलकर्णी हे मार्गदर्शन करणार असून, प्रमुख पाहुणे म्हणून दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष ॲड. राजाभाऊ पाटील व मराठा समाज सुधारणा मंडळाचे अध्यक्ष श्री. प्रकाश मरगाळे उपस्थित राहणार आहेत.
हेरंब कुलकर्णी हे महाराष्ट्रातील शिक्षण व सामाजिक क्षेत्रातील चळवळीमध्ये काम करणारे कार्यकर्ते आहेत. त्यांचे मार्गदर्शन सीमा भागातील शिक्षकांना मिळावे यासाठी हे व्याख्यान आयोजित केले आहे. या व्याख्यानाला सीमा भागातील शिक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन प्रबोधनीचे अध्यक्ष जयंत नार्वेकर व मराठी विद्यानिकेतन शाळेचे अध्यक्ष व प्रबोधिनीचे सचिव सुभाष ओऊळकर यांनी केले आहे. व्याख्यान ठीक चार वाजता सुरू होईल.
हेरंब कुलकर्णी यांचा परिचय

हेरंब कुलकर्णी हे पूर्णवेळ सामाजिक कार्यकर्ते असून ते एकल महिला, भटके विमुक्त, दारुबंदी, वंचितांचे शिक्षण, बालविवाह अशा अनेक विषयावर काम करतात.
एकल महिलांसाठी साऊ एकल महिला समिती असे महाराष्ट्राच्या ७० तालुक्यात विविध संस्थांचे नेटवर्क उभारून एकल महिलांचे पुनर्वसनाचे काम सुरू आहे.
त्यांची एकूण १२ पुस्तके व तीन पुस्तिका प्रसिद्ध झाल्या आहेत.
त्यांच्या लेखनाचे विषय हे मुख्यत्वे शिक्षण व सामाजिक प्रश्न असे आहेत. शिक्षणविषयक पुस्तकात शाळा आहे शिक्षण नाही (ग्रंथाली), परीक्षेला पर्याय काय (मनोविकास), जे कृष्णमूर्ती आणि कृष्णमूर्ती स्कूल्स (मनोविकास प्रकाशन), शिक्षकांसाठी साने गुरुजी (मनोविकास प्रकाशन), बखर शिक्षणाची (राजहंस प्रकाशन), आमच्या शिक्षणाचे काय? (मनोविकास प्रकाशन), माझी शिक्षण परिक्रमा (राजहंस प्रकाशन) अशी असून सामाजिक विषयात सहावा वेतन आयोग व दारिद्र्याची शोधयात्रा (समकालीन प्रकाशन) ही पुस्तके प्रसिद्ध आहेत. कॉमन मॅन (ग्रंथाली) व ‘अस्वस्थ क्षणांच्या नोंदी’ हे कवितासंग्रह प्रसिद्ध आहेत. त्याच बरोबर बालविवाह या विषयावर त्यांचे पुस्तक लवकरच प्रसिद्ध होते आहे..
प्रत्यक्ष सामाजिक प्रश्नांचा अभ्यास करून त्याचा अहवाल मांडणे व कृती साठी संघटनांच्या मते मदतीने पाठपुरावा करणे अशी त्यांची कामाची पद्धत आहे.
शेतकरी मुलांचे लग्न होत नाही अशा विषयांवर त्यांनी प्रत्यक्ष फिरून अभ्यास केला आहे. महाराष्ट्रातील सर्व प्रमुख व्याख्यानमाला मध्ये शिक्षण व सामाजिक प्रश्नांवर त्यांनी १०० पेक्षा जास्त व्याख्याने दिली आहेत. अण्णा हजारे, मेधा पाटकर, डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या सोबतही त्यांनी काम केले आहे…
Belgaum Varta Belgaum Varta